भाजपने रुग्णालयाला टाळे ठोकताच जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी …

रुग्णालयात एका डॉक्टरची तात्काळ नियुक्ती…

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाला भाजपने टाळे ठोकताच जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. भाजपाने नाक दाबल्यावर जिल्हा आरोग्य यंत्रणेने आपोआप तोंड उघडले आहे. प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधव यांनी रुग्णालयाला भेट देत एका डॉक्टरची तात्काळ नियुक्ती केली आहे.

यापुढे या रुग्णालयात दोन डॉक्टर कार्यरत असतील असे डॉ. जाधव यांनी ठिय्या आंदोलन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानंतर भाजपाने आंदोलन मागे घेतले. डॉक्टर उपलब्ध नाहीत अशी तक्रार परत आल्यास पुन्हा रुग्णालयाला टाळे ठोकले जाईल असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने भाजपा पदाधिकारी आक्रमक झाले होते.

रुग्णालयाला कुलूप ठोकत त्यांनी रुग्णालयाला घेरावा घातला. रुग्णालयातील यंत्रणा सुधारल्याशिवाय व तात्काळ डॉक्टर दिल्याशिवाय कुलूप उघडणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. रुग्णालयात डॉक्टर नसल्याने सकाळपासून ताटकळत बसलेल्या रुग्णांची यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी विचारपूस केली. परंतु डॉक्टर नसल्याने ते सर्व रुग्ण उपचार न घेता माघारी परतले आहेत.यावेळी तालुकाध्यक्ष नाशीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, भालचंद्र साठे दिगंबर मांजरेकर, नगरसेवक राजन तांबे, सुंदराबाई निकम,आदी भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page