बांदा ता.२३-:* मडुरा – गोप क्षेत्रात गव्यांच्या कळपाकडून रब्बी पिकांचे अतोनात नुकसान करण्यात आले आहे. रेडकरवाडी येथील शेतकरी दीपक घाडी यांची मिरची, चवळी, नाचणी पिकांची गव्यांनी अक्षरशः नासधूस केली आहे. यामुळे या भागातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. वनविभागाने नुकसानीचा पंचनामा करुन भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
मडुरा परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिके घेतली जातात. सिंचनासाठी शेतकर्यांनी नदीवर गावात ५ हून अधिक मातीचे बंधारे श्रमदानातून घातले आहेत. मात्र, रानटी प्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गवे, माकड, लाल तोंडाची माकडे, मोर, डुक्कर आदी जंगली प्राण्यांकडून पिकांची नासधूस केली जात आहे.
मडुरा – गोप परिसरात सुमारे २० हून गव्यांचा कळप कार्यरत आहे. शेतकरी दीपक घाडी यांच्या मिरची, नाचणी व चवळी पिकांचे या कळपाकडून अतोनात नुकसान करण्यात आले आहे. मात्र त्यांची व्यथा वनविभागाकडून ऐकूनही घेतली जात नाही. दरवर्षी केवळ पंचनामे केले जातात. मात्र अद्यापपर्यंत एक रुपयाची सुद्धा भरपाई देण्यात न आल्याचे दीपक घाडी यांनी सांगितले.
