दोन महिला जखमी : बोलेरो आठ फूट खोल कोसळली
*💫बांदा दि.०६-:* पाडलोस इटलादेवी येथे एसटीला बाजू देताना सुसाट वेगात असलेली बोलेरो पिकअप सुमारे ८ फूट खोल मोरीपुलात कोसळली. या अपघातात दोन परप्रांतीय कामगार महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले आहे. हा अपघात आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत स्थानिकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरोडा-बांदा एसटी बस बांद्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी पाडलोसवरुन आरोसच्या दिशेने सुसाट वेगात बोलेरो पिकअप जात होती. त्यात चालकासह तीन महिला, दोन लहान मुले व अन्य एक पुरूष कामगार होता. पिकअपमध्ये माती भरलेली होती. एसटीला वेगातच बाजू देत असताना रस्त्यालगत असलेल्या झाडाला कार आदळली व सुमारे ८ फूट खोल शेतात कोसळली. त्याचवेळी आरोसच्या दिशेने जात असलेल्या सिद्धेश गावडे या युवकाने कारमधील जखमींना अन्य ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढले. स्थानिकांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी मदतकार्यात सहभाग घेतला. जखमींना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे.
