चोविस तासात चोरट्याचा शोध

वेंगुर्ला पोलिसांची कारवाई

वेंगुर्ला प्रतिनिधी– शिरोडा-बागायतवाडी येथील राजेंद्र यशवंत नाईक (५७) यांची चोरीस गेलेली डिस्कवर टू व्हीलर गाडी वेंगुर्ला पोलिसांनी चोविस तासात शोधून काढली. पोलिसांनी गाडीसह गोवा-वास्को द गामा येथील रोहित सुरेश नाईक (वय २७) याला अटक केले असून अधिक तपास सुरु आहे.

बागायतवाडी येथील राजेंद्र नाईक यांनी कामावरुन आल्यावर घराच्या पाठीमागे आपली बजाज डिस्कवर एम.एच.-०७-वाय-४१६५ ही टू व्हीलर उभी करुन ठेवली होती. सुमारे ३० हजार रुपचे किमतीची निळ्या रंगाची असलेली ही बजाज डिस्कवर दि. ११ फेब्रुवारी रात्री १० ते १२ फेब्रुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने जागेवरुन चोरुन नेली. याची तक्रार वेंगुर्ला पोलिस स्थानकात राजेंद्र नाईक यांनी सकाळी केली होती.

त्यानुसार वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये अज्ञान चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ सुरु करुन वेंगुर्ला हेडकॉन्स्टेबल कदम, पोलिस हवालदार अजय नाईक, पोलिस नाईक योगेश राऊळ, सुरेश पाटील अमर कांडर या पथकाने २४ तासात या प्रकरणाचा छडा लावत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. रोहित सुरेश नाईक (रा.गोवा- वास्को द गामा) असे गाडी चोरणा-याचे नाव आहे. शहरात गाडीवरुन जाताना तो दिसून आल्याने पोलिसांनी सदर दुचाकीसह त्याला ताब्यात घेतले. वेंगुर्ला पोलिसांच्या या धडक व तत्पर कारवाईबाबत अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page