लोकवर्गणीतून मिळालेली दहा हजार रुपये किमतीची टिव्ही नेली चोरून : निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वेंगुर्ले ता.१२-:* भुरट्या अज्ञात चोरट्याने तेंडोली आदोसे जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरी केली. शाळेच्या वर्गांच्या दरवाजाची कडी विस्कटून शाळेला लोकवर्गणीतून मिळालेली सुमारे दहा हजार रुपये किमतीची टिव्ही चोरून नेली.
या प्रकरणी आज १२ फेब्रुवारीला निवती पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निवती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये जि. प. शाळा तेंडोली आदोसे चे मुख्याध्यापक निळकंठ काशीराम धर्णे यांनी म्हटले आहे की, ११ फेब्रुवारी सायंकाळी ४.३० ते १२ फेब्रुवारी सकाळी ७.३० या कालावधीत ही चोरी घडली. शाळेच्या इयत्ता पहिली व दुसरी या वर्गातील पालक ग्रामस्थांनी लोकवर्गणीतुन इंटेक्स कंम्पनी ची एलईडी मॉडेल ची 43 इंची अँड्रॉइड टीव्ही भेट दिली होती. ती टिव्ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने या मुदतीत सदर वर्गाच्या दरवाजाची कडी कोणत्या तरी हत्याराने उचकटून तोडून आत मध्ये अनधिकृत प्रवेश करून चोरून नेली. या तक्रारी वरून निवती पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर चोरीची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक जी . व्ही. वारंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदर श्री. कांबळे करत आहेत.
