मालवण ता.१२-:* मालवण नगरपालिकेत दहा वर्षे सत्ता असताना आणि सुदेश आचरेकर सर्वेसर्वा असताना भुयारी गटार योजना सुरू होऊ शकली नाही. चुकीच्या पद्धतीने निधीचा वापर करण्यात आला. मात्र आता स्वतःच्या अपयशाच खापर सुदेश आचरेकर दुसऱ्यांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत असून पुढील निवडणुकीत मालवण नागरपालिकेवर भाजपची सत्ता येणार आहे अशी वल्गना करत आहेत. त्यामुळे ज्यांच्या कारकिर्दीत ही योजना बंद पडली त्यांना लोक स्वीकारणार की ज्यांनी ही योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केला त्यांना स्वीकारणार याचा विचार भाजपने केलेला नाही.
तरीही सत्तेचे स्वप्न बघण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मात्र सुदेश आचरेकर यांचे सत्तेत येण्याचे स्वप्न हे स्वप्नचं राहील, अशी टीका मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. मालवण शहरातील भुयारी गटार योजनेच्या रखडलेल्या कामावरून सध्या शिवसेना व भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे द्वंद्व सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी महेश कांदळगावकर व आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली असताना महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आचरेकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार नाईक यांच्या कार्यशैलीवर जाहीर सभेतून स्तुतीसुमन उधळणाऱ्या सुदेश आचरेकर याना भुयारी गटार कामाबाबत अचानक आमदार यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित का करावी लागली. याचे खरे कारण भुयारी गटार योजना नसून पंधरा दिवसापूर्वी आमदार नाईक यांनी आचरेकर यांच्या प्रभागात बैठकीच्या वेळी तेथील लोकांनी मागणी केल्याप्रमाणे रस्त्यासाठी ३० लाख रुपये निधी आठ दिवसाच्या आत मंजूर केला हे खरे कारण आहे.
आमदार नाईक यांनी भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराच्या कामात सुधारणा झाली नाही तर कारवाई करणार असे म्हटल्यावर आचरेकर यांनी आमदारांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला. मात्र सन २०१२ – १३ साली आचरेकर यांच्या कालावधीत याच ठेकेदाराचे टेंडर रद्द करण्याबाबत ठराव करून तो जिल्हाधीकारी यांच्या कडे का पाठविण्यात आला होता. त्यावेळी आचरेकर यांचा अभ्यास कच्चा होता की आणखी काही कारण होते ? असा सवाल महेश कांदळगावकर यांनी उपस्थित केला आहे. सुदेश आचरेकर यांच्या कालावधीत २००९ साली नारायण राणे यांनी मंजूर करून दिलेली भुयारी गटर योजना चुकीच्या नियोजनामुळे १० वर्षात पूर्ण करण्यात आली नव्हती. या योजनेचे काम बंद पडून निधी अभावी कर्ज काढण्याची नामुष्की नगरपालिकेवर आलेली होती. मात्र आम्ही २०१६ साली सत्तेत आल्यावर ही बंद असलेली योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
शासनाने कर्ज काढुन ही योजना पूर्ण करण्याबाबत सूचित केले होते. परंतु याबाबत आमदार नाईक यांचे लक्ष वेधल्यावर त्यांनी खासदार विनायक राऊत, तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या मार्फत शासन स्तरावर पाठपुरावा करून सुमारे ९ कोटी रुपये अनुदान प्राप्त करून दिले आणि त्यामुळे नगरपालिकेवरची कर्जाची नामुष्की टाळली आणि या कामाला सुरुवात झाली. मागील दोन वर्षापासून कोरोना महामारी मूळे भुयारी गटारच्या कामास विलंब झाला ही वस्तुस्थिती आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण येणाऱ्या निवडणुका विचारात घेऊन ज्या कामासाठी आमदार नाईक आग्रही आहेत, त्या कामाबाबत निवेदन केलेल्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढून त्याचे राजकीय भांडवल करण्याचा, आणि आपल्या चुका झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप मार्फत केला जात आहे, अशी टीका महेश कांदळगावकर यांनी केली आहे.
भुयारी गटार योजनेच्या कामावरून भाजप पक्षात एकमत दिसत नाही. भाजप मधून निवडून आलेले उपाध्यक्ष राजन वराडकर आणि गणेश कुशे हे भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याबाबत प्रेस घेऊन आमदार नाईक यांची भूमिका योग्य आसल्याचे सांगतात, आणि लगेच दुसऱ्या दिवशी भाजप कार्यालयात सुदेश आचरेकर हे ठेकेदार यांच्यावर कारवाई करणे योग्य नसून आमदार नाईक यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करतात. आणि या दोन्ही प्रेस ला गणेश कुशे उपस्थित राहतात. त्यामुळेच भुयारी गटार योजनेबाबत भाजपमध्येच एकवाक्यता दिसत नाही. येणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथी मारण्याचे काम सुरू आहे, अशी टीकाही कांदळगावकर यांनी केली आहे.
