स्वर्गपथी जणू दीपची गमला…

कोकणचा ‘लोकराजा’ विसावला;दशावतार कलेने ‘सुधीर’ गमावला

सावंतवाडी ता.०७संतोष ठाकूर-:* लोभस चेहरा, आकर्षक देहबोली, भरगच्च शरीरयष्टी, राजबिंडे व्यक्तिमत्व, संवादाची अचूक फेक आणि अभिनयाची उत्कृष्ट जाण या गुणांच्या जोरावर गेली चार दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेले दशावतार कलेचे शिरोमणी, कोकणचे सुपुत्र सुधीर कलिंगण आज काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे लाखो चाहते, सहकारी आणि कुटुंबियांसाठी हा धक्का असहनीय आहे. त्यांच्या एकाकी जाण्याने रसिकांनी एक अष्टपैलू कलाकार गमावला असून दशावतार कलेचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. सुधीर कलिंगण यांनी आपल्या सर्वंकष अभिनयाने सुमारे ४० वर्षांहून अधिक काळ दशावतार कलेवर हुकूमत गाजविली. दशावतारी वेष धरण केलेले त्यांचे रुबाबदार रुपडे रसिकांच्या मनःपटलावर कायमचे कोरले गेले आहे. केवळ आपल्या नावावरच हजारो रसिकांची गर्दी खेचण्याची अफाट क्षमता त्यांच्या अभिनयात होती. ‘सुधीर कलिंगण’ हे नावच नाटकाच्या प्रसिद्धीसाठी पुरेसे होते.

सुधीर यांना दशावतार कलेचे बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळाले. त्यांचे वडील बाबी कलिंगण हे तत्कालीन ख्यातनाम दशावतार कलाकार. पहिली काही वर्षे इतर मंडळात काम केल्यानंतर त्यांनी ‘कलेश्वर दशावतार’ हे स्वतःचे नाट्यमंडळ सुरु केले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सुधीर यांनी दशावतार नाट्यक्षेत्रात पाऊल टाकले आणि दशावतार कलेला एक राजबिंडा चेहरा मिळाला. एक अष्टपैलू कलाकार मिळाला. अल्पावधीतच त्यांचे नाव राज्यभरात प्रसिद्ध झाले. आपल्य प्रदीर्घ कलासेवेत सुधीर यांनी देशभरात हजारो नाट्यप्रयोग सादर केले. त्यांच्या जबरदस्त ‘एन्ट्री’ने नाट्यगृहात पसरणारी शांतता, संस्कृत सुभाषितांचा सुयोग्य वापर, अचूक संवादफेक, प्रसंगानुरूप सादर केलेली देहबोली आणि चेहऱ्यावरील गंभीर स्मितहास्य यांच्या जोरावर काही क्षणातच सभा जिंकण्याची कला त्यांना उपजत प्राप्त होती.

त्यांनी साकारलेल्या श्रीकृष्ण, श्रीराम आणि इतर अनेक भूमिका अजरामर झल्या आहेत. या भूमिका आजही रसिकांना भुरळ घालतात. त्यांच्या कलेचा सन्मान म्हणून त्यांना शासन, विविध संस्था आणि मंडळानी अनेक पुरस्कारांनी गौरविले. दशावतार नाट्यकलेची धुरा समर्थपणे वाहतानाच सुधीर यांनी युवा कलाकारांना संधी देऊन अनेक दशावतार कलाकार घडविले. हे सर्व करीत असताना त्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदारीकडेही दुर्लक्ष केले नाही. एसटी महामंडळातील आपली चालकाची नोकरीं सांभाळून त्यांनी दशावतार कलेची आजन्म साधना केली. रात्रभर जागरण करून सकाळी गाडी चालविणे तसे कठीण काम. पण प्रखर कलासक्तीमुळे सुधीर यांनी हे शिवधनुष्यही लीलया पेलले. असा हा कलेचा थोर उपासक, दशावतार कलेचा अनभिषिक्त सम्राट आज आपल्यातून निघून गेला. कधीही संपू नये, असे वाटणाऱ्या एका कलानाट्याचा आज अखेरचा पडदा पडला. सुधीर कलिंगण आज देहरूपाने आपल्यात नाहीत, पण आपल्या दर्जेदार अभिनयाने आणि त्यांनी साकारलेल्या अविस्मरणीय भूमिकांनी ते सदैव आपल्या स्मरणात, नव्हे आपल्या हृदयात राहतील. ‘ग्लोबल महाराष्ट्र’च्यावतीने सुधीर कलिंगण यांना विनम्र आदरांजली…

You cannot copy content of this page