ग्रामस्थांसह प्रवासी झाले आक्रमक : पाडलोस मडुरा येथील प्रकार; तात्काळ माती न हटवल्यास काम बंद पाडण्याचा इशारा
बांदा ता.०४-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस मडुरा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सुरू असलेल्या पाईपलाईन खोदाईची माती पूर्णपणे रस्त्यावर टाकून ढिगारे उभे करण्यात आले आहेत. तसेच पोकलेन मशीन वापरल्याने रस्ता उखडला असून याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी केला. पूर्ण रस्ता ब्लॉक झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. ठेकेदाराने तात्काळ मातीचे ढिगारे बाजूला करून रस्ता वाहतुकीस निर्धोक करावा अन्यथा अपघात टाळण्यासाठी आम्हाला कामबंद करावे लागेल असा इशारा, शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी दिला.
मडुरा पाडलोस सीमाभागात रस्त्याला खेटून पाईपलाईन खोदाईचे काम सुरू आहे. ठेकेराने भररस्त्यात माती साठवून ठेवल्याने वाहनांना येजा करण्यास गटाराचा वापर करावा लागत आहे. त्यात पोकलेन सारख्या मशीनने काम सुरू असल्याने रस्त्याचेही नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण असा सवाल राजू शेटकर यांनी केला. तर पोकलेन मशिनमुळे रस्ता उखडला आहे त्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करा. तसेच सद्यस्थितीत पोकलेनखाली टायर घालून काम करा, असे पाडलोस ग्रामपंचायत माजी सदस्य नंदा गावडे यांनी सांगितले. यावेळी सुधीर गावडे, विजय पालकर, अनु गावडे, आदी उपस्थित होते. कामास आमचा कोणताही विरोध नसून ठेकेराने रस्त्यावर मातीचे ढिगारे उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, असे उपस्थितांनी सांगितले. दरम्यान, सर्व माती तात्काळ हटविणार असून ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन ठेकेदाराने केले.
