शिक्षक संघाने दिले शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
ओरोस ता.२८-:* शाळा सुरू करण्याच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. परंतु आरटीपीसीआर टेस्टच्या सक्तीला विरोध असल्याचे निवेदन अखिल सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने प्राथमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांच्याकडे दिले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, राज्य संयुक्त चिटणीस महादेव देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमोल पाटील आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या प्राथमिक शाळा लवकर सुरू व्हाव्यात, अशी आमच्या संघटनेची मागणी आहे. परंतु त्यासाठी शिक्षकांवर आरटीपीसीआर टेस्टची सक्ती न करता लसीकरणाची दोन डोस पूर्ण झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना स्थानिक व्यवस्थापनाची परवानगी देऊन तसेच मार्गदर्शक सर्व सूचनांचे पालन करून शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
