जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात क्रांतिकारक बदलाची अपेक्षा – बाबा मोंडकर

मालवण (प्रतिनिधी) पर्यटन विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र सरकारकडून दत्तक घेण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सागरी पर्यटनाबरोबर अन्य पर्यटन क्षेत्रात वाढ होईल. जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात क्रांतिकारक बदलाची जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाला अपेक्षा आहे, असे महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगत केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे.

राज्यसरकारने १९९९ साली पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा जाहीर केला. परंतु गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ लोटूनही जिल्ह्यातील पर्यटन वाढ व विकासासाठी सरकारचे अधोरेखित होईल, असे योगदान नाही. जिल्ह्यातील पर्यटन भारताच्या, जगाच्या नकाशावर पोहचविण्याचे महत्वाचे कार्य हे जिल्ह्यातील स्थानिक व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक यांचे आहे.

सरकारची कुठलीही मदत नसताना पर्यटन व्यवसाय उभा करण्यास शासनाची कुठलीही पॉलिसी, अनुदान नसताना स्थानिकांनी स्वबळावर पतसंस्था, शेड्युल बँक, सावकारी जास्त दराने कर्ज घेऊन जिल्ह्याचे नाव पर्यटन क्षेत्रात कार्य करून देशविदेशात पोहचविले, असे बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. केंद्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विषयासाठी दत्तक घेतल्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील बीच, कल्चर ,ऍग्रो,मेडिकल ,हिस्ट्री, फूड टुरिझम क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी राज्य व केंद्र सरकार कडून स्थानिकांस आवश्यक टुरिझम पॉलिसी बनेल. तसेच गेले दोन वर्षे नैसगिक आपदा, कोरोना सारख्या महामार मुळे उध्वस्त झालेल्या पर्यटन व्यावसायिकांना बळ मिळेल, अशी आशा महासंघाला वाटते. आज जिल्ह्यात सागरी पर्यटन क्षेत्रात वाढ होत आहे. देशविदेशातील लाखो पर्यटक सागरी पर्यटनासाठी जिल्ह्यामध्ये येत असतात. केंद्र सरकारने पर्यटन विषयी जिल्हा दत्तक घेतल्याने सिंधुदुर्ग जिल्हात खऱ्या अर्थाने सागरी पर्यटना बरोबर अन्य पर्यटन क्षेत्रात वाढ होईल, यासाठी जिल्ह्यातील व्यावसायिकांनी व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी समन्वयाची व पर्यटन वाढीची भूमिका ठेवावी. याबाद्दल राज्य व केंद्र सरकारचे विशेष अभिनंदन तसेच यामुळे जिल्हातील पर्यटना मध्ये क्रांतिकारक बदलाची अपेक्षा महासंघास आहे, असे बाबा मोंडकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page