राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा पाठपुरावा; महिन्याभरात कामांना प्रत्यक्षात सुरुवात
कणकवली ता.२८-: गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करत असलेली नवीन कुर्ली वसाहतीतील सुमारे १ कोटी ४६ लाख रुपयांची विकासकामे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून मंजुर करण्यात आली आहेत. तर देवधर प्रकल्पातर्गत २ कोटी ५० लाख, ५० हजारचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
अशी माहिती राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिली. कणकवलीतील कार्यालयात पत्रकार परिषदेत श्री. पिळणकर बोलत होते.
यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, युवक तालुकाध्यक्ष सागर वारंग, युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण,देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते. देवधर प्रकल्प अंतर्गत नवीन कुर्ली वसाहत स्थापित होऊन ३२ वर्षं झाली. मात्र अनेक वर्षे प्रश्न प्रलंबित होते. या प्रलंबित कामाचा मी पाठपुरावा केला.असे सांगताना राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले, नवीन कुर्ली वसाहत गावासाठी १ कोटी ४६ लाख १० हजार निधी मंजूर झाला. व कालवा संदर्भात २ कोटी ५० लाख ५० हजार मंजूर झाले. प्रलंबित मागण्या होत्या यात स्ट्रीट लाईट मंजुरी, शाळा दुरुस्ती, अंतर्गत रस्ते साफसफाई करणे, नळयोजना पाईपलाईन जुनी होती, ती देखील बदलण्यात येणार आहे. या कामासाठी ९९ लाख ५८ निधी मंजूर झाला आहे. नळ योजना दुरुस्ती व मनुष्यबळासाठी ८ लाख निधीला मंजुरी मिळाली. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून या कामासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकार असताना काही जणांकडून या कामांच्या बाबतीत श्रेय वाद सुरू होता. येत्या एक महिन्यामध्ये या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल याकरिताचा निधी देखील मंजूर झाला असल्याचे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी सांगितले.
