जिल्हाधिकारी यांनी बोलाविले चर्चेला;उपोषण केले स्थगित
मालवण ता.२७-: कालावल खाडीपात्रातील ‘ए ६’ या वाळूपट्ट्यात चुकीच्या पद्धतीने मूल्यमापन करून देण्यात आलेली वाळू परवान्यावरील स्थगिती अन्यायकारक असल्याचे सांगत शासनाच्या कारभाराविरोधात काल प्रजासत्ताक दिनी रेवंडी येथे खाडी पात्रात उपोषणास बसलेल्या वाळू व्यावसायिक सुदेश कांबळी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेचे निमंत्रण दिल्याने हे उपोषण कांबळी यांनी स्थगित केले आहे.
आपल्यावरील अन्यायाबाबत सुदेश कांबळी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला होता. २७ मे २०२१ रोजीच्या आदेशाने सुदेश कांबळी यांनी कालावल खाडीपात्रात रेवंडी येथील ‘ए ६’ या वाळूपट्ट्यात वाळू उत्खनन करण्याचा परवाना घेतला होता. त्यानंतर २ जून रोजी रेवंडी सरपंच व तहसीलदार मालवण यांच्या पत्रांन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडून कांबळी यांच्या परवान्याला स्थगिती देण्यात आली. यावर बाजू मांडायला जिल्हा प्रशासनाने संधी दिली नाही, शिवाय आपल्या पत्राला कोणतेही लेखी उत्तर मिळाले नाही, याउलट रेवंडी गावात शासनाच्या आशीर्वादाने बेसुमार वाळू उत्खनन सुरू असून रेवंडी सरपंचांच्या मालकी जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप कांबळी यांनी निवेदनात केला होता.
आपण कायदेशीर बाबी पूर्ण करून आपल्या सर्व अटी शर्ती मान्य करून घेतलेल्या परवान्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अन्यायकारक स्थगिती देत तक्रारदार याना अनधिकृत वाळू उत्खननास पाठबळ दिले जात आहे.
‘ए ६’ या वाळू पट्ट्यात चुकीचे मूल्यमापन करून मला स्थगिती आणि दुसऱ्यांना परवानगी दिलेली आहे. हा आपल्यावर जाणीवपूर्वक अन्याय असल्याने न्यायासाठी खाडीपात्रातच २६ जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कांबळी यांनी दिला होता. त्यानुसार काल त्यांनी उपोषण छेडले. यावेळी त्यांच्या समवेत विवेक कांबळी, रमेश कांबळी, अखिल कांबळी, चलिता कांबळी, गौरी कांबळी, मृणाल कांबळी आदी उपस्थित होते. स्थगिती आदेश लादल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोणतीही बाजू मांडायची संधी दिली नाही, असा आरोप कांबळी यांनी करत आपण जिल्हाधिकारी यांना नोव्हेंबर महिन्यात वाळूपट्ट्यात वाळू स्थगित केल्याप्रकरणी प्रत्यक्ष पाहणी करून न्याय द्यावा, असे पत्र दिले होते. मात्र त्यावरही प्रशासनाकडून लेखी उत्तर वा प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली नसल्याने आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागत आहे, असे यावेळी कांबळी यांनी सांगितले. यावेळी तलाठी, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी यांनी उपोषण स्थळी भेट देत कांबळी यांच्याशी चर्चा केली. या दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी कांबळी यांना चर्चा करण्याबाबतचे निमंत्रणाचे पत्र पाठविले. जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेचे आमंत्रण दिल्याने सुदेश कांबळी यांनी उपोषण स्थगित केले.
