१४ मार्चपर्यंत ऊसतोडणी १०० टक्के पूर्ण करणार

कारखाना अधिकाऱ्यांचे आश्वासन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी ता २५ सिंधुदुर्ग जिल्हा बँक, ऊस उत्पादक शेतकरी आणि डी व्हाय पाटील साखर कारखाना यांच्या संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस पिकाची तोडणी लवकर व्हावी यासाठी जादा ३० ऊसतोड टोळी देण्याचे साखर कारखान्याची अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. ह्या टोळ्या १ फेब्रुवारी जिल्ह्यात दाखल होतील आणि १४ मार्च पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस पिकाची १०० टक्के तोडणी पूर्ण केली जाणार असल्याची माहिती नूतन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोड व वाहतूक करताना अनेक अडचणी येतात या विरोधात सोमावरी या शेतकऱ्यांनी उंबर्डे (वैभववाडी) येथे रास्तारोको आंदोलन केले होते. याची दखल घेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्हा बँक सभागृहात ऊस उत्पादक शेतकरी व डी व्हाय पाटील साखर कारखाना यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, बँक संचालक, कारखाना अधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात अद्यापही ६० टन उस शिल्लक आहे. मात्र उसाची तोडणी करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही तोड पूर्ण झालेली नाही. मात्र ती वेळेत न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने आजच्या बैठकीत साखर कारखाना अधिकाऱ्यांना जिल्ह्यात ऊसतोड करणाऱ्या टोळीच्या संख्येत वाढ करण्यात यावी याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यासाठी जादा ३० ऊसतोड टोळी देण्याचे मान्य केले आहे. तर १५ फेब्रुवारी नंतर आणखी १५ टोळ्या देण्यात येणार असल्याने १४ मार्च पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस पिकाची १०० टक्के तोडणी पूर्ण केली जाणार आहे. वाढीव वाहन कर कारखान्याने उचलावा गगनबावडा घाट रस्त्याची दुरवस्था पाहता वाहतूकदार शेतकऱ्यांकडून वाढीव १०० रुपये वाहन कर घेत आहेत. मात्र हा शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड असल्याने हा वाढीव वाहन कर साखर कारखान्याने उचलावा यासाठी साखर कारखाना अध्यक्षांची लवकरच भेट घेत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मनीष दळवी यांनी दिली.

You cannot copy content of this page