शाळा बंद न करता शाळा सुरू ठेवण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी…

शिक्षण सहाय्यक संस्थेचे सचिव सीए लक्ष्मण नाईक यांची तहसीलदारांनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

*⚡सावंतवाडी ता.११-: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पहिली ते आठवी च्या शाळा बंद करण्यात आल्या असून, त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. गेली दोन वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शाळा बंद न करता त्यावर शासनाने ठोस उपाययोजना करून शाळा सुरू ठेवाव्यात अशी मागणी शिक्षण सहाय्यक संस्था माजगाव संस्थेचे सचिव सीए लक्ष्मण महादेव नाईक यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात खालील मुद्दे उपस्थित केले आहेत. कोव्हिट १९ मुळे दोन वर्षे जनता होरपळली आहे, परंतु आता सामना करायला पण शिकली आहे. आत्ताची परिस्थिती सरकार दाखवते तेवढी गंभीर आहे असे जाणवत नाही. तसेच शाळा सुरु ठेवण्यासाठी शाळेच्या जवळपास किंवा ४ ते ५ शाळांच्या मध्यावर फक्त मुलांसाठी कोव्हिड सेंटर उभारुन आणि तात्काळ सेवा देवून हया प्रश्नावर तोडगा निघू शकतो. सरकार अथवा सरकारी यंत्रणा याबाबत गांभीर्याने विचार करत नाही. तसेच एकदा बंद केले की आमचे काम संपलं असे सरकारला वाटत असावे बाकी काय ते पालक व शिक्षक बघून घेतील. शिक्षण ऑनलाईन सुरु ठेवता येईल पण ऑनलाईन नंतर ऑफलाईन सुरु झाल्यावर विद्यार्थामध्ये झालेली तथाकथित प्रगती आम्ही चांगलीच अनुभवत आहोत. स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष अध्यापन करणान्या शिक्षकांना हा निर्णय घेताना विचारात घेतले असेल असे वाटत नाही.

मुलांच्या शाळा बंद करण्यात आल्या, मग मुलांच्या संदर्भात पुढील ध्येय धोरणे काय? उदा. सेतू अभ्यास मधून काय साध्य झाले हे समजले नाही. शिवाय ग्रामीण भागात असलेल्या इंटरनेटच्या सुविधा आणि ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती याबाबत आपण परिचित असाल अशी आशा वाटते. तसेच वीजेची समस्या पण ग्रामीण भागात भेडसावते. पालकांची आमच्याकडे शाळा पूर्णवेळ सुरु करण्याबाबत वारंवार मागणी होत आहे. सरकारला/सरकारी यंत्रणांना लहान मुलांच्या आरोग्याबाबत खुपच काळजी आहे यात वाद नाही, पण शाळा बंद ठेवणे हा यावर उपाय होऊ शकत नाही. हि परिस्थिती मागील दोन वर्षापासून आहे, परंतु यावर मात करण्यासाठी कोणतेही उपाय मागील दोन वर्षांत केल्याचे जाणवत नाही. एवढया दिवसात हया परिस्थितीवर काहीना काही तोडगा काढणे आवश्यक होते. मुलांना सरसकट पास करणे हा यावरील तोडगा होऊ शकत नाही. आमची तर अशी धारणा झाली आहे की आपण विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळत आहात. कोव्हिड लाटेच्या काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी शासनाने योग, प्राणायाम, व्यायाम हे घरच्या घरी करण्यास प्रोत्साहीत करावयास हवे होते, पण तसे प्रयल झाल्याचे दिसत नाही. सकस आहार देण्याबाबतही कोणतीही व्यवस्था झालेली नाही.यावेळी डी.के सावंत उपस्थित होते.

You cannot copy content of this page