*⚡कणकवली ता.११-: यारा फाऊंडेशन, कणकवली यांच्यामार्फत कणकवली येथे मोफत अगरबत्ती प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. कोविड-१९ च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आणि पन्नास टक्के उपस्थितीत हे शिबीर संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिराला सर्व तालुक्यातील प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता.
लहानसा का असेना पण आपला काहीतरी व्यवसाय आहे आणि आपण त्याचे मालक आहोत, ही भावना प्रत्येकाला नवी उभारी देणारी असते. म्हणूनच अशा स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रश्मी दाभोलकर यांनी या प्रशिक्षणार्थींना अगरबत्ती व्यवसायाबद्दल योग्य असे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या प्रश्नांचे समाधान केले. सध्याच्या कोरोनाच्या काळात या अगरबत्ती व्यवसायातून एक चांगले मिळकतीचे साधन प्राप्त होऊ शकते, अशा भावना यावेळी प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केल्या. यारा फाउंडेशन मार्फत शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही यारा फाउंडेशन कार्यरत आहे. या अगरबत्ती प्रशिक्षण शिबिराला यारा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विश्वराज विकास सावंत, नीलम विजय राणे, समीर गोपाळ परब श्रेयश अरविंद शिंदे उपस्थित होते. प्रस्ताविक श्रेयश अरविंद शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करत, मास्कचा वापर करत आणि सामाजिक अंतर राखून पार पडला.
