दोन दिवसात कार्यान्वित न झाल्यास कार्यालयाला घेराव घालणार; युवासेना कार्यकर्ते संदेश राणे यांचा इशारा
दोडामार्ग ता.११सुमित दळवी-: भारत संचार निगम लिमिटेड यांचा भोंगळ कारभार हा नेहमीच चव्हाट्यावर असतो. तेरवण मेढे येथील बीएसएनल मोबाईल टॉवर गेले पंधरा दिवस बंद असून त्याकडे संबधीत अधिकारी व खाते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तिलारी परिसरात विशेषतः मेढे, हेवाळे, मुळस, घाटीवडे, सोनावल गावांसाठी एकमेव संपर्क यंत्रणा साधन असलेला हा टॉवर बंद असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात हा बंद टॉवर कार्यान्वित न झाल्यास बीएसएनएल ला घेरावो घालण्याचा इशारा युवा सेना कार्यकर्ते संदेश राणे यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की नेहमी वेगवेगळ्या कारणाने हा टॉवर बंद होत असतो,मात्र गेल्या १५ दिवसात रेंज व कॉलिंग यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.दिखाव्या साठी टॉवर उभा केलेला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.
