“त्या” व्यापाऱ्यांना दिली दुकाने थाटून
*⚡मालवण ता.१०-: कोरोना विषयक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे मालवणात आठवडा बाजारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या नगरपालिकेने देऊळवाडा येथे अडवत कोणतीही पूर्वसूचना न देता बाजार भरविण्यास मज्जाव केल्यानंतर या कारवाईमुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला न जुमानता नागरिकांनी व्यापाऱ्यांना दुकाने थाटायला लावली. यामुळे नागरिकांच्या आक्रमकतेपुढे नगरपालिका प्रशासन झुकले असून दुकाने थाटली गेल्याने मालवण आठवडा बाजारास सुरुवात झाली.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आजपासून राज्यात निर्बंध लागू झाले असताना आज मालवण शहरात सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजरासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या भल्या पहाटे नगरपालिका प्रशासनाकडून देऊळवाडा येथे अडविण्यात आल्याने मालवण- कसाल व सागरी महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागून वाहतूक विस्कळीत झाली. कोणतीही पूर्व सूचना न देताच प्रशासनाने आठवडा बाजार भरविण्यास मज्जाव केल्याने व्यापारी व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी नगरपालिकेचा एक सफाई कामगारच ही कारवाई हाताळताना दिसत होता. यावेळी कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने नगरपालिकेच्या या कारवाईबाबत नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र नगरपालिकेच्या या भोंगळ कारभारावर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता व्यापाऱ्यांना देऊळवाडा येथे दुकाने थाटण्यास सांगितले. नागरिकांच्या पुढाकारातून दुकाने थाटली गेल्याने काही तास खोळंबलेला आठवडा बाजार सुरू झाला.
