इतिहासातील महिलांचे आदर्श जोपासा

प्रा. जगदीश धोंड यांचे प्रतिपादन;आरपीडी प्रशालेत ‘महिला शक्तीचा जागर’ उत्साहात

*⚡सावंतवाडी ता.०८-: आजच्या काळात महिला वर्गाने इतिहासाचे अध्ययन करून त्याचा बोध घेत जीवन जगावे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी अशा रणरागिणींचा आदर्श आजच्या महिलांनी घेतल्यास निश्चितच एक नवा इतिहास घडेल, असे प्रतिपादन येथील आरपीडी विद्यालयाचे प्रा. जगदीश धोंड यांनी केले. महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या ‘जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ या विशेष अभियानांतर्गत आरपीडी जुनियर कॉलेज सावंतवाडी येथे ‘स्त्री शक्तीचा जागर’ या विषयांतर्गत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी प्रा. जगदीश धोंड होते. उपप्राचार्य सुमेधा नाईक, ज्येष्ठ शिक्षक कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांनी प्रथम वेशभूषा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा आणि वेशभूषेला साजेसा अभिनय सादर करत स्पर्धेत रंगत आणली.

कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संतोष पाठरवट यांनी केले. स्पर्धेत सहभागी असलेल्या अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा साकारून स्पर्धेत रंगत आणली. विशेषत: वैष्णवी उदय गावडे, सिमरन वाघेला, गौरी धुरी, सायली भैरे, सरगम घाडी, अदिती माळकर, नम्रता राऊळ यांनी साकारलेल्या वेशभूषा व भूमिका लक्षवेधी ठरल्या. ह्या सर्व विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कला सादर करीत विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. मिलिंद कासार, प्रा. स्मिता खानोलकर व प्रा. रणजीत माने यांनी केले.

स्पर्धेसाठी संयोजनाची जबाबदारी प्रा. वामन ठाकूर, प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, प्रा. सविता कांबळे, प्रा. रुपाली नार्वेकर यांनी पार पाडली. प्रा. विजया सावंत, प्रा. प्रज्वला कुबल, प्रा. दीपा मोरजकर, प्रा. रणजीत राऊळ, प्रा. विधिता गवंडे यांनी स्पर्धा यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेची सांगता प्रा.केदार म्हसकर यांनी सादर केलेल्या सुश्राव्य गीत गायनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मिलिंद कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संतोष पाथरवट यांनी केले.

You cannot copy content of this page