सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील सुरंगपाणी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका तथा कवयित्री शामल शंकर मांजरेकर (पिळणकर) यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटरच्यावतीने मांजरेकर-पिळणकर यांना सुप्रसिद्ध अभिनेते कथा रात्रीस खेळ चाले ‘अण्णा नाईक’ फेम माधव अभ्यंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मांजरेकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. शामल मांजरेकर सातत्याने कविता, ललित, लेख असे विविध साहित्य लेखन करीत असून अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. तसेच महाविद्यालयीन स्तरावर प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी ‘ नेट’ ही युजीसीची परीक्षा देखील त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल वेंगुर्ला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शंकर मांजरेकर, पत्रकार संजय पिळणकर तसेच केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व जिल्हा परिषद शिक्षक यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
