बांदा सरपंच अक्रम खान यांचा बांधकाम विभागाला इशारा..
*⚡सावंतवाडी ता.०७-:बांदा ते दोडामार्ग रस्त्याचे डांबरीकरण करून तो दुरुस्त करावा अशी वारंवार निवेदनाद्वारे मागणी करूनही अजूनही सबंधित रस्ता पूर्णपणे दुरुस्त न केल्याने २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० :०० वाजल्यापासून बांदा – दोडामार्ग रस्ता सर्कलच्या बाजूला बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा बांदा सरपंच अक्रम खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांधकाम विभागाला दिला आहे. .
याबाबत अधिक माहिती अशी की,बांदा ते दोडामार्ग रस्ता वाहतुकीसाठी संपूर्ण खराब झाला असून, तो दुरुस्त करण्यात यावा यासाठी येथील रहिवासी बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करूनही अद्याप देखील हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही. आज देखील हा रस्ता अपूर्ण स्वरूपात असून, संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच वाहतूक करण्यासाठी देखील हा रस्ता धोकादायक झाला आहे. यावेळी पाण्याची पाईप लाईन टाकताना रस्ता दुरुस्तीचे पैसे जीवन प्राधिकरणने पैसे देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी अक्रम खान यांनी बांधकाम विभागवार केला आहे.
