कांदळगाव- हडी येथील खार बंधाऱ्याप्रश्नी ग्रामस्थांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष

*⚡मालवण ता.३०-: हडी व कांदळगाव मध्ये खारभूमी योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला चिखलफळ्या बसविण्यात न आल्याने कांदळगाव व हडी येथील शेतजमिनीत खारे पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला असून याबाबत तात्काळ कार्यवाही करून चिखलफळ्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी कांदळगाव व हडी येथील ग्रामस्थानी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. १५ दिवसात कार्यवाही न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता खारभूमी विभागाच्या अधिकाऱ्यांना खाऱ्या पाण्याचा जलाभिषेक करू असा इशारा ग्रामस्थांतर्फे उमेश कोदे यांनी दिला आहे. यावेळी कृषि संघटन कांदळगावचे अध्यक्ष उमेश कोदे, भूषण सुर्वे, विश्वास मुळये, आबा साळकर, रामदास परब, गुरुनाथ मांजरेकर आदी व इतर उपस्थित होते. कांदळगाव व हडी या दोन्ही गावांना शासनाच्या खारभूमी विकास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या खारबंधाऱ्यात पावसाळयानंतर बसविण्यात येणाऱ्या चिखलफळया संबंधित खात्याने अद्यापपर्यंत बसविल्या नसून परीणामी कांदळगाव येथील १०६ व हडी येथील ११८ हेक्टर ओलिताखालील शेतजमिनीत कोणत्याही क्षणी खारेपाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण शेतजमिन नापिक होणार असून नदी परीसरातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या विहीरींचे पाणी खारट होऊन परीसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. तसेच परीसरातील माड, सुपारी, केळी आदी बागायती नष्ट होण्याचा धोका निर्माण होणार आहे. तर गुरांच्या वैरणीचा प्रश्नही निर्माण होणार आहे. याबाबत संबंधित विभागाशी ग्रामपंचायत लोकप्रतिनधी व शेतकरी ग्रामस्थांकडून लेखी व दुरध्वनीमार्फत विनंत्या करुनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, असे ग्रामस्थानी निवेदनात म्हटले. याबाबत जिल्हाधिकारी यांनी जातीने व तातडीने लक्ष घालून खार बंधाऱ्यास त्वरीत चिखलफळया बसविण्याचे आदेश संबंधित खात्यास आपणाकडून देण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थानी निवेदनातून केली. ग्रामस्थांच्या या मागणीवर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी संबंधित खार भूमी विकास विभागाच्या अधिकऱ्यांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती उमेश कोदे यांनी दिली. याबाबतचे निवेदन खार भूमी विभाग अधिकाऱ्यांना दिल्यावर त्यांनी १५ दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र १५ दिवसात कार्यवाही न झाल्यास अधिकऱ्यांना खाऱ्या पाण्याचा जलाभिषेक करू असा इशारा उमेश कोदे यांनी दिला.

You cannot copy content of this page