जिल्हा बँकेवर नारायण राणेंचीच सत्ता

भाजप नेते दत्ता सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण (प्रतिनिधी) अतिशय चुरशीच्या बनलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मालवणात शांततेत मतदान पार पडले असले तरी महाविकास आघाडी व भाजप मध्ये जिल्हा बँक काबीज करण्यासाठी लागलेली चढाओढ शाब्दिक प्रतिक्रियांमधून दिसून आली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर भाजपचाच झेंडा फडकेल असा विश्वास भाजप नेते दत्ता सामंत यांनी व्यक्त केला तर महाविकास आघाडीचे आमच्यासमोर कोणतेही आव्हान नाही असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी सांगितले.

तर जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडी भाजपचा धुव्वा उडवेल असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार मेघनाद धुरी यांनी केला आहे. जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकेल – दत्ता सामंत जिल्हा बँकेच्या निवणुकीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने अथक मेहनत घेतली आहे. गेली दहा वर्षे नारायण राणे यांच्या आशीर्वादानेच कारभार सुरू असून दहा वर्षात बसलेले चेअरमन राणेंच्याच आशीर्वादाने बसले. जिल्ह्यातील वातावरण पाहिले तर सर्व १९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. मालवणातील भाजपचे उमेदवार बाळू कुबल यांनी सहकार क्षेत्रात चांगले काम केले असून त्यांचा विजय निश्चित आहे. नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकेल असेही दत्ता सामंत यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे कोणतेही आव्हान नाही – अशोक सावंत जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजपने दिलेले उमेदवार हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांपेक्षा चांगले व सरस आहेत. त्यामुळे भाजपचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी व्यक्त केला.

तसेच महाविकास आघाडीचे आम्हाला कोणतेही आव्हान वाटत नाही, जिल्हा बँकेवर भाजपचीच सत्ता येईल असेही सावंत म्हणाले. महाविकास आघाडीचे पॅनल बहुमताने निवडून येईल – मेघनाद धुरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठी मेहनत घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पॅनलच्या बाजूनेच मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडेल आणि महाविकास आघाडीचे पॅनल पूर्ण बहुमताने निवडून येईल असा विश्वास मालवण मधील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page