कोईलच्या गणपती मंदिर कलशारोहण सोहळ्यास कलश मिरवणुकीने प्रारंभ

*⚡मालवण ता.२७-:*’एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव असलेल्या मालवण तालुक्यातील कोईल गावच्या श्री गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून नवीन वास्तूचा कलशारोहण सोहळ्यास आजपासून प्रारंभ झाला. यानिमित्त मंदिरावर आरोहण करण्यात येणाऱ्या कलशाची मिरवणूक गावच्या वेशीवरुन वाजत गाजत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आली.

या सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण तालुक्यातील कोईल गावात श्री गणपती मंदिर असून ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेमुळे हे गाव प्रसिद्धीस पावले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून कलशारोहण सोहळ्यास आज पासून प्रारंभ झाला. यानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर मंदिर परिसरही विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. या मंदिराच्या बाजूलाच सद्गुरू श्री साटम महाराज जन्मस्थळ असून त्या मंदिरावरही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने गणपती मंदिरात आज सकाळपासून गणपती पूजन व पुण्याहवाचन मातृका पूजन, नांदीश्राध्द नवग्रह पीठ, वास्तूपीठ, रुद्रपीठ आवाहन व पूजन, नवग्रह, वास्तू व रुद्र देवता हवन, क्षेत्रपाल देवता बलिदान, सुत्रवेष्टन श्रींच्या मंदिराभोवती कलश फिरवणे, पूर्णाहुती नैवेद्य, महाप्रसाद, श्रीं च्या कलशाचा धान्यदिवस आदी कार्यक्रम पार पडले. मंदिरावर आरोहण करण्यात येणारा कलश गिरगाव- मुंबई येथून आणण्यात आले आहेत. या कलशाची सायंकाळी गावच्या वेशीवरून व गावातून मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत काढलेल्या या मिरवणुकीत बहुसंख्य ग्रामस्थ, भाविक सहभागी झाले होते. मास्क वापरून व कोरोनाचे नियम पाळून ही मिरवणूक काढण्यात आली. तर रात्री नामस्मरण, दिंडी भजन स्पर्धा आदी कार्यक्रम पार पडले. मंगळवार दि. २८ रोजी श्री गणेश पूजा, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राध्द, नवग्रह पीठ, ब्रह्मादी मंडळ पीठ, गणेश याग पीठ, आवाहन पूजन, शिलालेख उद्घाटन समारंभ, श्री गणेश चरणी अभिषेक व सहस्त्र आवर्तने कलश अभिषेक व कलशारोहण, नैवेद्य व आरती, महाप्रसाद, नामस्मरण (संध्याकाळी ६.३०), दिपोत्सव (संध्याकाळी ७ वा.), सत्कार समारंभ / स्मरणिका प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर बुधवार दि. २९ रोजी श्री गणेश पूजा, नवग्रह पीठ, ब्रह्मादी मंडळ पीठ, देवतांची नित्य पूजा, अग्नि स्थापना, नवग्रह, श्री गणेश याग हवन, श्री क्षेत्रपाल देवता बलिदान व पूर्णाहुती, महानैवेद्य व आरती, श्री सत्यनारायण पूजा (४ वाजता) किर्तन (सायं. ६ वाजता), वाद्यवृंद – ऑर्केस्ट्रा – मराठी पाऊल पडते पुढे (रात्रौ ९ वा.) आदी कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम कोरोना विषयक नियम पाळून साध्या पद्धतीने होणार आहेत. भाविकांनी सहकार्य करत कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page