*⚡सावंतवाडी ता.२७-:* येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित दुसऱ्या तुतारी कविसंमेलनात युवा लेखक समीर वेंगुर्लेकर यांच्या ‘अर्ध्या घडीचा डाव’ या कथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
वेंगुर्लेकर हे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत.
यावेळी संमेलनाध्यक्ष कवी विठ्ठल कदम, उद्घाटक कवी दीपक पटेकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य, कार्यवाह भरत गावडे, ज्येष्ठ लेखिका उषा परब, मालवणी कवी रुजारिओ पिंटो, कोमसापचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, लेखक समीर वेंगुर्लेकर, सौ. स्वरा वेंगुर्लेकर, ॲड. संतोष सावंत, ॲड. नकुल पार्सेकर, मेघना राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी वेंगुर्लेकर यांच्या ‘अर्ध्या घडीचा डाव’ या पुस्तकाचे समीक्षण मराठी विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक भरत गावडे यांनी केले. नवोदित युवा लेखक समीर वेंगुर्लेकर यांच्या ‘अर्ध्या घडीचा डाव’ या पुस्तकात एकूण दहा कथा असून सर्व कथा अत्यंत दर्जेदार व वाचकांना आवडतील अशा आहेत, असे सांगून गावडे यांनी दोन कथांचे समीक्षणही केले. लेखक समीर वेंगुर्लेकर म्हणाले की, मला लहानपणापासून लेखनाची आवड होती. त्यामुळे मी कथा लिहीत गेलो. सावंतवाडीतील सिंधूकिरणचे चंद्रहास उकिडवे यांनी माझ्या दहा कथांचे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यावेळी ज्येष्ठ कवी विठ्ठल कदम यांच्याशी माझी ओळख झाली आणि मग कदम सरांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापुरातील अभिनंदन प्रकाशन यांच्यामार्फत माझा पहिलावहिला कथासंग्रह ‘अर्ध्या घडीचा डाव’ तयार झाला. यात एकूण दहा निरनिराळ्या कथांचा समावेश असून कथेत मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देण्याचाही माझा प्रयत्न आहे. हा कथासंग्रह वाचकांनी जरूर वाचावा व आपल्या प्रतिक्रिया आशीर्वादरूपात द्याव्यात, असेही आवाहनही वेंगुर्लेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी, तर आभार भरत गावडे यांनी मानले. उपस्थितांनी वेंगुर्लेकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
