कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत दिले निवेदन;जोरदार घोषणाबाजी
*⚡कणकवली ता.२७-:* जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे जिल्हा बँक निवडणूक प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करा, या मागणीसाठी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने असलेल्या शिवसैनिकांनी सोमवारी सकाळच्या सुमारास कणकवली पोलीस ठाणे गाठले.
तत्पूर्वी शिवसैनिकांनी येथील पोलिसांच्या पेट्रोलपंपासमोर शिवसेना व संतोष परब यांच्या समर्थनार्थ तसेच विरोधकांबाबत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर कणकवली पोलीस ठाण्यासमोरच पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांची भेट घेत मागणीचे निवेदन सादर केले. सदर हल्लाप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेले आमदार नीतेश राणे यांना तात्काळ अटक करा, असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनात ते म्हणतात,शिवसेना कार्यकर्ते तसेच जिल्हा बँक निवडणुकीतील मतदार संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर २०२१ रोजी धारधार चाकूने प्राणघातक हल्ला करून दहा दिवस उलटले तरी मुख्य सूत्रधाराला अद्याप पोलीस अटक करू शकले नाहीत . हल्ला करणाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर आता नितेश राणेंना फोन करणार असे म्हटल्याचे फिर्यादी संतोष परब यांनी आपल्या जबाबात स्पष्ट सांगितले आहे . असे असूनही आपण आमदार नितेश राणे यांना फक्त चौकशीला बोलावून सोडून दिले आहे . आमदार नितेश राणे हे केंद्रीय मंत्री ना . नारायण राणे यांचे पुत्र असल्याने ना . नारायण राणे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन आपली केंद्रात सत्ता असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण राजकीय दबावाखाली तपास करत असल्याचे निदर्शनास येत आहे . तरी याप्रकरणी मुख्य सूत्रधार आमदार नितेश राणे यांना तात्काळ अटक करावी तसेच जिल्हा बँक मतदार प्रमोद वायगणकर गेल्या आठ दिवसापासून तळेरे येथून बेपत्ता असून त्याचाही तपास पोलीस यंत्रणा करू शकली नाही . वरील दोन्ही घटनेबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी . असे निवेदन पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, शेखर राणे, भास्कर राणे, रुपेश आमडोसकर, भूषण परुळेकर, संदेश पटेल, जि.प.सदस्य संजय आग्रे, कन्हैया पारकर, महेंद्र डीचवलकर,आबु पटेल,ललित घाडीगावकर, प.स.सदस्य मंगेश सावंत, रिमेश चव्हाण, नीलम सावंत-पालव, दिव्या साळगावकर ,राजू राठोड, रामू विखाळे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोरदार घोषणाबाजी संतोष परब हल्लाप्रकरणी कणकवली पोलिसांना निवेदन देण्यापूर्वी आम. वैभव नाईक, शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक एकवटले होते. यावेळी शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत असताना आमदार नितेश राणे यांच्याविरोधातही घोषणा देण्यात आल्या. ‘बाबा मला वाचवा… कॉक कॉक कॉक कॉक’ ही घोषणा देत शिवसैनिकांनी विधानभवनात नितेश राणेंनी काढलेल्या ‘म्याव म्याव’ आवाजाचा बदला घेतल्याचे आज दिसून आले. मुख्य सूत्रधाराला अटक करा यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीतील सतीश सावंत यांच्या प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर झालेला हा भ्याड हल्ला निषेधार्थ आहे पोलिसांनी हल्ल्याच्या सूत्रधारांना ताबडतोब अटक करावी अन्यथा शिवसेना गप्प बसणार नाही असा इशारा दिला. तर शिवसेना युवा नेते संदेश पारकर म्हणाले ,सिंधुदुर्ग रक्तरंजित करणे हा विरोधकांचा निवडणुकीतील आजपर्यंतचा इतिहास आहे. निवडणुका आल्या की मतदारांना गायब करणे, त्यांना मारहाण करणे असे प्रकार सुरू होतात.याबाबत प्रशासनाला आम्ही यापूर्वीच कल्पना दिली होती परंतु संतोष फरच्या हल्ल्यामागील सुत्रधाराला अटक होत नाही . कोणाचा दबाव आहे का ?असा सवाल संदेश प्रकरण उपस्थित करत सदर प्रकारणामगील सुत्रधाराला अटक करा अशी मागणी केली.
