वेंगुर्ला प्रतिनिधी– देशपातळीवर वेंगुर्ला शहराने स्वच्छतेबाबतचा आपला दबदबा नेहमीच दाखवला आहे. वेंगुर्ला शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२२मध्येही सहभागी होत आहे. या अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छतेबाबत विशेष व नाविन्यपूर्ण कामगिरी करणा-या नागरिकांसाठी ‘स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा २०२२‘ या द्वारे देशपातळीवर नाव कमविण्याची सुवर्ण संधी निर्माण केली आहे.
या स्पर्धेत शहरातील नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, एनजीओ, सामाजिक संस्था, बचतगट, नागरिक समूह, नविन व्यावसायीक आदी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेमध्ये दैनंदिन जीवनातून प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी पर्यायी मार्ग, नागरिकांद्वारे रस्त्यावर कचरा टाकला जाऊ नये यासाठी उपाययोजना, विविध ठिकाणी कंपोस्ट खताची निर्मिती व वापर, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा वर्गीकरणाची संकल्पना, कच-यावर पुनःप्रक्रिया व पुनःनिर्मिती, कच-याची वैज्ञानिक विल्हेवाट, कच-यापासून इंधननिर्मिती, घनकचरा व्यवस्थापनकरीता लोकसहभाग वृद्धीसाठी संकल्पना व स्वच्छतेबाबत इतर नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे.
या स्पर्धेची नावनोंदणी २४ डिसेंबरपासून नगरपरिषद येथे सुरु झाली असून ३० डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. स्पर्धकांनी ३० डिसेंबरपर्यंत वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय येथे संफ साधून आपल्या विषयाच्या निगडीत सर्व छायाचित्र, अहवाल जमा करावेत. स्पर्धेत सर्वोत्तम संकल्पना सादर करणा-या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ५ हजार, तीन हजार, दोन हजार व प्रशस्तिपत्र दिली जाणार आहेत.
स्पर्धकांचे परीक्षण करताना संकल्पनेची नाविन्यता, सद्यस्थितीत संकल्पना राबवित असल्यास अपेक्षित बदल व प्रत्यक्ष अंमलबजावणी, संकल्पनेचे व्यावहारिक मुल्यांकन, संकल्पनेच्या उपयोगितेचे मुल्यांकन, अंमलबजावणी करीता लागणारा कालावधी व साहित्य याचा विचार करण्यात येणार आहे. चौकट – या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी तसेच राज्यस्तरावरील स्पर्धेतून सर्वोत्तम संकल्पना राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार असून तेथे अंतिम निवड झाल्यास प्रकल्प अंमजबजावणी करीता विजेत्यांना केंद्र सरकारकडून २५ लाख रुपयांचे प्रोत्साहन निधी पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे.
