३१४ घरेलू महिला कामगारांना प्रलंबित लाॅकडाऊन आर्थिक मदतीचा लाभ

भारतीय मजदूर संघाच्या लढ्याला यश

*⚡मालवण ता.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सन २०११ ते २०१४ अखेर पर्यंत नोंदीत असलेल्या घरेलू महीला कामगारांना लाॅकडाऊन आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला यश आले असून ज्या घरेलू महीला कामगारांनी कामगार अधिकारी कार्यालयात आपल्या नोंदणीचे ऑनलाईन अपडेट केलेले आहे, अशा ३१४ घरेलू महीला कामगारांना प्रलंबीत लाॅकडाऊन आर्थिक मदत प्रत्येकी रु. १५०० प्रमाणे ४ लाख ७१ हजार जमा होणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस श्री. हरी चव्हाण यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील एप्रिल २०२१ च्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याणकारी मंडळाजवळ नोंदीत असलेल्या घरेलु कामगारांना आर्थिक मदत देण्याची मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली होती. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने प्रथम सन २०१५ ते २०२१ पर्यंत नोंदीत असलेल्या घरेलु कामगारांना १५०० रुपये अशी तूटपुंजी आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६९२ घरेलु महीला कामगारांना १० लाख ३८ हजार एवढी रक्कम कामगारांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली. मात्र भारतीय मजदूर संघाने याविरोधात आवाज उठवून सन‌ २०११ पासूनच्या सर्व नोंदीत घरेलु कामगारांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी लावून धरली. यासाठी मोर्चा, निदर्शने करण्यात आली. अखेर भारतीय मजदूर संघाच्या लढ्याला यश आले असून सन २०११ ते २०१४ अखेर पर्यंत नोंदीत असलेल्या व आपल्या नोंदणीचे ऑनलाईन अपडेट केलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महीला घरेलु कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे ३१४ घरेलु कामगारांना ४ लाख ७१ हजार मिळणार असल्याची माहिती हरी चव्हाण यांनी दिली. तसेच ज्या घरेलु कामगारांची नोंदणी होऊन ओळखपत्र मिळालेले आहे, पण आर्थिक मदत त्यांचे बॅंक खात्यात जमा होणार नाही अशा कामगारांनी भारतीय मजदूर संघाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page