ग्राहक संरक्षण कायद्याची लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे

प्रा नागेश कदम;तहसील कार्यालयात पार पडला ग्राहक दिन

मालवण, दि प्रतिनिधी ग्राहकांच्या हक्कांची जोपासणूक आणि संरक्षण करण्याची जबाबदारी ही वस्तू उत्पादकांबरोबर दुकानदारांचीही आहे. त्यासाठी ग्राहक हक्क संरक्षण कायद्याची लोक चळवळ निर्माण झाली पाहीजे असे प्रतिपादन प्रा. नागेश कदम यांनी आज येथे केले.

येथील तहसील कार्यालयात आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण कायदा कार्यशाळा पार पडली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुहास हडकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी पुरवठा शाखेचे नायब तहसीलदार एस. ए. राऊळ, नायब तहसीलदार आनंद मालवणकर, मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी, दुकानदार, ग्राहक उपस्थित होते. प्रा. कदम म्हणाले, ग्राहकांना सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, वस्तू निवडीचा हक्क, म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार करण्याचा आणि त्याचे निवारण करून घेण्याचा हक्क, ग्राहक जागृतीचा अधिकार या हक्कांबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. २४ डिसेंबर १९८६ मध्ये निर्माण झालेल्या कायद्याची पार्श्वभूमी, महत्त्व व ग्राहकांचे हित याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राहक हा देव आहे. त्याच्याशी प्रामाणिकपणे, सचोटीने वागणे गरजेचे असल्याचेही श्री. कदम यांनी स्पष्ट केले. श्री. राऊळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक श्री. कोकरे यांनी केले. श्री. मालवणकर यांनी आभार मानले. *फोटो* राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विवेकानंद यांच्या प्रतिमेस माजी उपनगराध्यक्ष सुहास हडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

You cannot copy content of this page