वेंगुर्ला प्रतिनिधी– आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे कार्य जवळून पाहाण्याचा योग आला. कोंडुरा कड्यावरील आरती प्रभूंच्या साहित्यावरील झालेला कार्यक्रम तर केवळ अविस्मरणीयच ठरला. आनंदयात्रीच्या संचालिका वृंदा कांबळी व सर्व कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह ओसंडत असतो. देशाटन, थोरामोठ्यांचा सहवास आणि सभासंमेलने हे ज्ञान मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. आनंदयात्रीतील सहभागातून हे सर्व मिळते, असे गौरवोद्गार साहित्यिक अजित राऊळ यांनी काढले.
आनंदयात्री वाङ्मय मंडळाचा स्नेहमेळावा १९ डिसेंबर रोजी वेंगुर्ला येथील ओंकार मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात आनंदात म्संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून कवी सुधाकर ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सचिन दळवी यांच्यासह राजाराम नाईक, वृंदा कांबळी, डॉ.आनंद बांदेकर, महेश राऊळ उपस्थित होते
पूर्वसुरींच्या कवितांचा व साहित्याचा अभ्यास करावा. नवोदित कवींनी मर्ढेकर, केशवसुत, बालकवी, करंदीकर, बोरकर, खानोलकर, ग्रेस अशा दिग्गज कविच्या कवितांची पारायणे करावीत. तसेच पाश्चात्य साहित्याचाही अभ्यास करावा असे आवाहन सुधाकर ठाकूर यांनी केले. तर आनंदयात्रीच्या कार्यातून प्रेरित होऊन चांगले साहित्यिक वेंगुर्ला तालुक्यात होतील असा आशावाद सचिन दळवी यांनी व्यक्त केला. स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून ‘सृजनवाट‘ या कार्यक्रमांतर्गत कवी विनय सौदागर यांच्या ‘भोवताल‘ या मालवणी भाषेतील काव्यसंग्रहावर वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून साकारलेला अभिनव असा काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला. तर ‘रंग उगवतीचे‘ या कार्यक्रमांतर्गत आनंदयात्रीतील कविंच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला. यात अजित राऊळ, सुधाकर ठाकूर, पांडुरंग कौलापुरे, डॉ.संजीव लिंगवत, फाल्गुनी नार्वेकर, वासुदेव पेडणेकर, प्रतिक्षा भगत, प्रितम ओगले, प्राजक्ता आपटे, प्रमोद तांबोसकर आदींनी स्वरचित कविता सादर केल्या. कवीसंमेलनाचे रंगतदार सूत्रसंचालन पांडुरंग कौलापुरे यांनी केले. याच मेळाव्यात आनंदयात्रीचे सक्रीय सदस्य डॉ.आनंद बांदेकर यांना पि.एच.डी. मिळाल्याबद्दल व महेश राऊळ यांचा सर्पमित्र व रक्तमित्र म्हणून विशेष कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. संजय पाटील यांनी प्रास्ताविक, प्रा.सचिन परुळकर यांनी सूत्रसंचालन तर गुरुदास तिरोडकर यांनी आभार मानले.
