त्वरित कार्यवाही न केल्यास रस्ता बंद करण्याचा सुरेश भोगटे यांचा इशारा
*⚡सावंतवाडी ता.२१-:* जिओ केबलसाठी चार दिवसांपूर्वी शहरातील वैश्यवाडा ते शिवाजी चौक दरम्यान खोदलेल्या चरांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे नगरपरिषदेचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही केली नाही. आज, मंगळवारी दुपारपर्यंत उपाययोजना न केल्यास रस्ता बंद ठेवून नगरपरिषदेचा निषेध करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी दिला आहे.
सावंतवाडी शहरामध्ये जिओ केबलसाठी रस्त्याच्या बाजूला चर खोदण्याचे काम सुरु असून वैश्यवाड्याच्या लगत शिवाजी चौक गवळी तिठ्यापर्यंत चर खोदून चार दिवस उलटले. मात्र त्याच चरामधून वाहनांसह नागरिकांना जावे लागत आहे. याबाबतची माहिती नगरपरिषद अभियंत्यांना माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी माहिती दिली.
मात्र गेले चार दिवस यावर कोणतेही कार्यवाही झालेली नसून आजही त्याच चरातून नागरिकांना जावे लागत आहे. कालच संध्याकाळी एका महिलेच्या पायाला त्याच खोदाईमुळे दुखापत झाली. याबाबत आज दुपारपर्यंत उपाययोजना न केल्यास संपूर्ण काम थांबवून रस्ता बंद करण्यात येईल. तसेच नगरपरिषदेचा निषेध करण्यात येईल आणि शेताचे बोर्ड लावण्यात येतील, असा इशारा भोगटे यांनी दिला आहे.
