मालवण किनारपट्टी स्वच्छ राखण्याचा युवा फोरम संघटनेचा संकल्प

नगरपालिका व लोकसहभागातून राबविण्यात येणार मोहीम

*⚡मालवण ता.१७-:* पर्यटन दृष्ट्या विकसित होणाऱ्या मालवण शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेतानाच नागरिकांचे आरोग्य विचारात घेऊन मालवण किनारपट्टी स्वच्छ राखण्याचा संकल्प युवा फोरम या संघटनेने सोडला असून यापुढे नगरपालिकेबरोबरच लोकसहभागातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

युवा फोरमचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे आणि त्यांच्या टीमने मालवण बंदर जेटी येथील स्टॉलधारकांशी संवाद साधत परिसर स्वच्छतेबाबत त्यांची मते जाणून घेतली.यावेळी मनीषा पारकर, स्वाती पारकर, युथ फोरमचे केतन शिरोडकर, दिक्षा लुडबे, एल्विरा गिरकर, हर्षल देसाई, रोहन करमळकर, विनोद निकम, मेगल डिसोजा आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित नागरिकांनी मालवण बंदर जेटी येथे नगरपालिकेचे स्वच्छता वाहन नियमितपणे येत नाही. आलेच तर वाहन कचऱ्याने भरलेले असते. कचरा एकत्र ठेवण्यासाठी समुद्र किनारी कुंड्यांची गरज आहे. जेणेकरून कचरा समुद्र किनारी टाकला जाणार नाही, असे सांगितले . यावेळी युथ फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी मालवणचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची नगर पालिकेत भेट घेऊन किनारा स्वच्छतेसाठी कशाप्रकारे नियोजन करता येऊ शकेल, याबद्दल चर्चा केली. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण शहर समन्वयक निखील नाईक उपस्थित होते. मुख्याधिकाऱ्यांनी युथ फोरमच्या उपक्रमाचे स्वागत केले.

किनारा स्वच्छतेसाठी नगरपालिका आणि लोकसहभागातून जेवढे काम करता येईल, तेवढे आपण नक्की करू, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. तसेच युथ फोरमने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याशीही चर्चा केली.

You cannot copy content of this page