पर्यटन व्यवसायिकांनी दिला इशारा…
मालवण दि प्रतिनिधी-: तारकर्ली देवबाग खाडीत जलपर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाईच्या नोटिसा बजावल्यानंतर संतप्त झालेल्या तारकर्ली देवबाग येथील पर्यटन व्यावसायिकांनी मालवणचे बंदर कार्यालय गाठत बंदर अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. आम्हाला विनापरवाना जल पर्यटन करण्याची हौस नाही. अधिकृत बोटींसाठी आवश्यक असणारी परवानगी देण्यास महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून विलंब होत आहे आणि त्यामुळे आमच्यावर अनधिकृत हा शिक्का बसला आहे. बोटिंग व्यावसायिकांचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पर्यटन व्यावसायिकांनी दिला.
तारकर्ली खाडीत बोटिंग व्यवसाय करणाऱ्या काही नौकाधारकांना बंदर विभागाने कायदेशीर कारवाईबाबत नोटिसा बजावल्याच्या पार्श्वभूमीवर • देवबाग आणि तारकर्ली येथील बाबली चोपडेकर, रमेश कद्रेकर, राजेश केरकर, समील सारंग, गुरू मोंडकर, लक्ष्मण कुबल, दिनेश देऊलकर, हनुमंत टिकम, परशुराम टिकम, सतीश टिकम, संजय वाईरकर, भरत राऊळ, समीर कांदळगावकर, राकेश तांडेल, गणपत मोंडकर आदींनी बंदर कार्यालयात जाऊन बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्याशी चर्चा केली यावेळी बोटिंग व्यावसायिकांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाकडून कोणतीही मदत न घेता, स्थानिकांनी मालवणचे पर्यटन वाढविले आहे. स्कुबा डायव्हिंग, बोटिंग, वॉटरस्पोर्टस्, पॅरासेलिंग आदी पर्यटन प्रकार प्रचंड लोकप्रिय झाल्याने गेल्या काही वर्षात येथे पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. म्हणूनच एमएमबीनेही त्याच वेगाने पर्यटन व्यावसायिकांना विविध परवानगी मिळाव्यात म्हणून कार्यवाही करणे अपेक्षित असताना बंदर विभागाकडून तसे नियोजन दिसत नाही. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. बंदर विभागाकडून वेळेत नौकेची नोंदणी केली जात नाही. एक वर्ष झाले, तरी वार्षिक सर्व्हे मिळत नाही. त्यामुळे नौकाविहार परवानगी योग्यवेळी हाती पडत नाहीत. मग नौका तपासणीवेळी बोटिंग व्यावसायिकांना त्याचा त्रास करावा लागतो. ज्यावेळी नौकेचा सर्व्हे केला जातो, तेव्हा सहा नंबरचे तात्पुरत्या स्वरुपाचे प्रमाणपत्र दिले जाते. पण त्याचवेळी जर वार्षिक सर्व्हे करून दिला गेल्यास सगळी कामे वेळेत पूर्ण होऊ शकतील. सर्व्हे प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने सागरी अभियंत्यांकडून परवानी मिळत नाही. नौकाविहार सर्व्हे परवानगीचे अधिकार जिल्ह्यातील कार्यालयांनाच दिले जावेत, अशी मागणी जल पर्यटन व्यावसायिकांकडून करण्यात आली. दरम्यान, यावेळी जल पर्यटन व्यासायिकानी आम्हाला अधिकृत बोटींसाठी आवश्यक असणारी परवानगी देण्यास महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून विलंब होत असल्याने याला सर्वस्वी जबाबदार मेरी टाइम बोर्ड असल्याने अधिकाऱ्यांनी आम्हाला नोटीसा बजावून भीती दाखवू नये आम्ही आमचा व्यवसाय सुरूच ठेवणार असल्याचे जल पर्यटन व्यावसायिक म्हणाले
