⚡देवगड, ता.२०-: शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या एकूण १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, प्राध्यापिका सुहासिनी कदम, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. सरस्वती पूजनानंतर दहावीतील १६ व बारावीतील ३ अशा एकूण १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
दहावीमध्ये राज्ञी विवेक कुलकर्णी हिने १०० टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले, तर बारावीमध्ये सानिया अर्जुन धरणे हिने प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत यशामागील मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले.
मुख्याध्यापक प्रवीण खडपकर यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावर जीवनातील कोणतेही ध्येय गाठता येते, असा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवाजी ढाकणे यांनी केले.
देवगड हायस्कूलमध्ये १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ..
