सावंतवाडी (प्रतिनिधी):
आंबोली परिसरात वन्यजीव शिकार केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगल्याच्या आरोपाखाली दिनांक १८ जून २०२६ रोजी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी प्रत्येकी रुपये २५,०००/- च्या जामिनावर मुक्तता केली आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात मांडलेला भक्कम युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा निर्णय दिला.
सविस्तर वृत्त असे की, आंबोली जंगलात वन्यजीव शिकार करणे आणि शस्त्र बाळगून फिरताना आढळून आल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी १८ जून रोजी धडक कारवाई करत या संशयित आरोपींना अटक केली होती. या अटकेनंतर त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने वकिलांच्या फळीने न्यायालयात भक्कम कायदेशीर बाजू मांडली:
आरोपी क्र. १ (पवन प्रकाश देसाई), क्र. ३ (हसीम हुसेन काझी), क्र. ४ (भरत नवलु पाटील), क्र. ५ (वनु विठ्ठल फोंडे) आणि क्र. ६ (गणेश तुकाराम पाटकर) यांच्या वतीने ॲड. राहुल प्रसाद पै, ॲड. अमित नाईक, ॲड. ऐश्वर्या पिंगुळकर आणि ॲड. राहुल जाधव यांनी कामकाज पाहिले.
आरोपी क्र. २ (जावेद सलीम जमादार) आणि क्र. ७ (आकाश मोहन कुरणे) यांच्या बचावार्थ ॲड. सचिन सावंत आणि ॲड. प्रितेश सावंत यांनी युक्तिवाद केला.
आरोपी क्र. ८ व ९ यांच्या वतीने ॲड. परिमल नाईक, ॲड. सुशील राजगे आणि ॲड. रश्मी नाईक यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.
बचाव पक्षाच्या वकिलांनी कायद्यातील तरतुदी आणि वस्तुस्थितीच्या आधारे केलेला प्रभावी युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. त्यानंतर सावंतवाडी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सर्व संशयित आरोपींची प्रत्येकी २५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
