आमदार दीपक केसरकर; सावंतवाडी येथील नियोजित सैनिक प्रशिक्षण शिबिर केंद्रासाठी आमदार निधीतून २५ लाखाची देणगी जाहीर
सावंतवाडी ता.१३-:जिल्ह्यातील युवकांनी सैन्य दलात भरती होण्यासाठी माजी सैनिकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले. तर शहरात नगरपालिकेने प्रशिक्षण शिबिर केंद्र उभारण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर प्रशिक्षण शिबिर केंद्र उभारण्यासाठी २५ लाख रुपयाची देणगी आमदार निधीतून देण्याचे जाहीर केले.
यावेळी त्यांनी हे केंद्र उभारण्यासाठी ज्या परवानग्या आवश्यक आहेत त्या तात्काळ देण्यात याव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्याकडे केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघ व आजी-माजी सैनिक महिला बचत गट महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 1971च्या इंडो-पाक युद्धात सहभागी सैनिक व शहीदांच्या कुटुंबीयांचा सत्कार सोहळा येथील सैनिक मुलांचे वसतिगृह या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमात आमदार श्री केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, सैनिक कल्याण प्रभारी अधिकारी श्रीधर गावडे, सैनिक पतसंस्था चेरमन शिवराम जोशी, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष तातोबा गवस आदी उपस्थित होते.
