बाळ कनयाळकर यांचा आरोप;ओबीसी आरक्षणाला भाजपचाच विरोध असल्याची केली टीका
*⚡कुडाळ ता.१३-:* ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकाच घेऊ नये, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली असताना भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निवडणुका ठरलेल्या वेळेतच घेण्याचा अट्टाहास संभ्रमित करणारा आहे. यावरून ओबीसी आरक्षणाला भारतीय जनता पक्षाचाच विरोध असल्याचे स्पष्ट होत आहे. राणे यांनी नगरपंचायत निवडणुकाऺबाबत दुटप्पी भूमिका घेऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर यांनी केले आहे. तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षण प्रश्नाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूका स्थगित कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कनयाळकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे,मात्र भाजपाचे पदाधिकारी वाघ यांनी ओबीसी आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करून ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत ओबीसी जागा रिक्त ठेवून अन्य जागावरील निवडणूका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या या अनपेक्षित निकालामुळे ओबीसी समाजाबरोबरच सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला. त्यामुळे सर्व स्तरातून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकाच घेऊ नये,अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तसेच महाविकास आघाडीनेसुद्धा ओबीसी आरक्षण डावलून निवडणूका नको म्हणून कॅबिनेट बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतला आहे. निवडणुका झाल्या तर ओबीसींना घेऊनच, अन्यथा सर्वच निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात यावा. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोवर निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूका स्थगित कराव्यात असे ठरविले. तसेच सर्वच राजकीय पक्षांची भुमिका हीच आहे. मग भाजपचेच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निवडणूका ठरलेल्या वेळेतच घेतल्या पाहिजेत, महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत नसल्याने घोषित निवडणूका राज्य सरकारचा पुढे ढकलण्याचा डाव आहे, असे संभ्रमित विधान केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष ओबीसी समाज आरक्षणाविरोधात आहे हे ओबीसी समाजाला समजलं आहे. त्यामुळे येत्या प्रत्येक निवडणुकीत ओबीसी समाज भारतीय जनता पक्षाला सहकार्य करणार नाही, असे नमुद करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निवडणुकी घेण्याबाबतचे ते विधान भारतीय जनता पक्षाचे की व्यक्तीगत नारायण राणे यांचे मत आहे ॽ याचा खुलासा नारायण राणे यांनी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर यांनी केली आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लागत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणूका निवडणूक आयोगाने घोषित करू नये, असेही कनयाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
