स.पो. निरीक्षक स्वाती यादव यांनी घेतला पुढाकार; रवी जाधव, संजय पेडणेकर, सुरेश भोगटे, सतिश बागवे, प्रदीप कांबळे यांनी केली मदत
सावंतवाडी ता.१३-:सावंतवाडी येथे एका ठेकेदाराकडे कामासाठी इंदोर येथून आलेले ११ परप्रांतीय कामगार आणि तीन मुले गेले दोन दिवस सावंतवाडी शहरात अडकून पडले होते. दोन दिवस उपाशी राहिल्याने भूक सहन न झाल्याने त्यांनी शहरातील लोकांकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. हा प्रकार सायंकाळी ७ च्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या निदर्शनास आला. त्यानी तातडीने त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली असता, संबंधित प्रकार उघडकीस आला.
यावेळी त्यांनी सबंधित ठेकेदाराला फोन केला असता, त्याने आपले सावंतवाडीतील काम बंद पडले असून, सद्य स्थितीत आपले काम वाशिम ला सुरू असून, त्या ठिकाणी पाठवून द्यावे असे स्पष्ट केले. यावेळी स.पो. नि. स्वाती यादव यांनी त्यांच्या खाण्याची सोय केली. तसेच सबंधित प्रकार सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांना संपर्क साधत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी देखील तत्परता दाखवत माजी नगरसेवक संजय पेडणेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, प्रा. सतिश बागवे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कांबळे यांना संपर्क साधला. यावेळी सर्वांनी त्यांना आर्थिक मदत करत सहकार्य केले. तसेच रवी जाधव यांनी त्यांना आपल्या भावाच्या टेम्पो मध्ये बसवून कुडाळ रेल्वेस्टेशनवर सोडले. या सर्वांनी केलेल्या मदत कार्याची सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
