विजयी उमेदवार अधिकृत नगरसेवक तर पराभूत उमेदवार स्वीकृत नगरसेवक; आमदार नितेश राणे यांनी केले जाहीर…
वैभववाडी प्रतिनिधी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग 8 मधून युवा शिलेदार संताजी रावराणे व रोहन रावराणे हे अपक्ष चिन्हावर निवडणूक लढवतील. निवडून आलेला उमेदवार भाजपाचा अधिकृत नगरसेवक असेल. तर पराभूत उमेदवार स्वीकृत नगरसेवक असेल. असे आमदार नितेश राणे यांनी आज जाहीर केले. वैभववाडी येथे भाजपा प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे यांनी वैभववाडीत पत्रकार परिषद घेतली. प्रभाग 8 च्या उमेदवारीवरून सोशल मीडियावर फिरत असलेल्या बातम्या बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया जाहीर केली. ते म्हणाले, युवा नेते संताजी अरविंद रावराणे व रोहन जयेंद्र रावराणे हे अपक्ष चिन्हावर निवडणूक लढवतील. त्या प्रभागात भाजपा कोणतीही बॅनरबाजी करणार नाही. पक्षाचा अधिकृत उमेदवार उभा राहणार नाही. पक्षाचे कार्यकर्ते प्रभागात फिरताना दिसणार नाहीत. निवडणूक झाल्यावर दोन्ही उमेदवार भाजपाचे असतील. विजयी उमेदवार भाजपाचा अधिकृत नगरसेवक असेल, तर पराभूत उमेदवाराला स्वीकृत नगरसेवकाची संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
