कलम १४४ तात्काळ रद्द करा, अन्यथा ‘जेलभरो’

मंगेश तळवणेकर यांचा इशारा;परिवहनमंत्री अनिल परब यांना दिले निवेदन

*⚡सावंतवाडी ता.०५- :* एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर ज़िल्ह्यात लागू केलेले कलम १४४ तात्काळ रद्द करावे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य करून संप मिटवावा. अन्यथा ७ डिसेंबर रोजी रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी बसस्थानकासमोर जेलभरो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आरोग्य व शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांना दिला आहे.

निवेदनात तळवणेकर यांनी म्हटले आहे की, मेस्मा लावतो, वेगवेगळे कायदे लावून जेलमध्ये टाकतो, असे सांगत आहात. परंतु कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांचा, आईवडिलांचा, कुटुंबातील सदस्यांचा, मुलांच्या शिक्षणाचा, आईवडीलांच्या औषधपाण्याचा, जेवणखाण्याचा, घरभाडे, लाईटबील, पाणी बील याचाही विचार करावा. जे काही चालले आहे ते चुकीचे आहे, असे सत्तेतील सर्व आमदार व मंत्र्यांना वाटत नाही का? हा अन्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, जोतीबा फुले यांच्या राज्यात हे योग्य आहे का? कलम 144 तात्काळ मागे घ्यावे. अन्यथा याचा फटका जिल्ह्यात महाविकास आघाडीलाच बसणार आहे. आमच्यावर कारवाई करा, पण सर्वसामान्य माणसांवर कारवाई करु नका. आम्ही सत्य बाजू मांडलीय ती ऐकून घ्या. शांततेत मोर्चा काढणे हा आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात ओमीक्रॉनमुळे जर कलम 144 लावले असेल तर ठीक होते. मात्र, आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्च्याला प्रतिबंध करण्यासाठी जर 144 कलम लावले असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील अत्यंत शांतताप्रिय जिल्हा आहे. त्यामुळे कलम 144 चा निर्णय आपण त्वरीत मागे घ्यावा. अन्यथा जनतेचा आपल्या शासनावरचा विश्वास उडेल. ही गरीबांची लढाई आहे. मी कुठल्याही पक्षाचा सभासद नाही. भारतचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीक म्हणून अन्यायाविरोधात लढतोय. त्यामुळे कलम 144 रद्द करावे आणि एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करुन त्यांचे विलीनीकरण करावे. अन्यथा ७ डिसेंबर रोजी रोजी सकाळी ११ वाजता एसटी बसस्थानकासमोर जेलभरो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page