आंबा व्यवसायिक व्यवसाय वृध्दी मार्गदर्शन मेळावा संपन्न…

मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित सिंधुदुर्ग या सहकारी संस्थेमार्फत आंबा व्यावसायिक शेतकऱ्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन मेळावा वायरी मालवण येथील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी उपस्थित मार्गदर्शकांनी आंबा व्यवसायातील विविध प्रश्नांबाबत आंबा व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी देवगड येथील प्रगतशील शेतकरी विद्याधर जोशी होते. जोशी यांनी आपल्या भाषणात २५ वर्षांनंतरच्या आंबा व्यवसायाची चिंता व्यक्त करत संस्थेबरोबरच सभासदांसाठी जी. आय. मानांकन प्राप्त करून दिलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. आंबाही आता भारतात परदेशातून येऊ घातला आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत जी आय मानांकन प्रत्येक आंबा व्यवसायिकांनी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे, असे जोशी यांनी सांगितले. मनश्या मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे डायरेक्टर मधुकर हेगडे व देवेंद्र डांगे यांनी आंबा, नारळ, काजू या पिकासाठीच्या उत्तम वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता व त्याचे व्यवस्थापन याबद्दल विस्तृत माहिती दिली व बागायतदारांसोबत चर्चा करून मार्गदर्शन केले. ग्रीन रिव्हॉल्युशनचे प्रतीक पाटील आणि त्यांच्या चमुने रासायनिक कीटकनाशकांच्या वापराशिवाय तुडतुडे फळमाशी व टिप्स या कीटकाच्या प्रतिबंधासाठी वापरायच्या ग्ल्यू टॅप, स्किकी टॅप, स्टीकी रोल याची माहिती प्रात्यक्षिकासह दिली. तर शिवली ॲग्रोचे श्रीधर पाठक यांनी आता देशांतर्गत तसेच आंबा निर्यातीसाठी आकर्षक पॅकिंग आदींची माहिती एलसीडी प्रोजेक्टरद्वारे दिली. आंबा निर्यातीसाठी आवश्यक परवाना मिळण्यास संदर्भातील आवश्यक माहिती यावेळी देण्यात आली. तसेच नारायण चेंदवणकर (बांबुळी, ता. कुडाळ) यांनी आंबा परागीकरणासाठी उपयोगी असणाऱ्या मधमाशी पेटीसंदर्भात माहिती दिली तर कोळंब मालवण येथील आंबा व्यवसायिक सूर्यकांत बांदेकर यांनी आपण परीक्षणपूर्वक पाठपुरावा करून माकडांपासून झालेली नुकसानीची भरपाई आपण रूची मिळवली त्या अनुभवाचे कथन केले व एकत्रित लढा देण्याची गरज विशद केली. संस्थेचे सचिव रत्नाकर कोळंबकर यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा मेळाव्याच्या प्रास्ताविकात सादर केला. सूत्रसंचालन संस्था सदस्य ऋषीकेश परब यांनी केले. आभार संस्थाध्यक्ष संजय नरे यांनी मानले.

You cannot copy content of this page