माजी आरोग्य सभापती आपा लुडबे यांचा आरोप
मालवण ता.३०-: आरोग्य आणि स्वच्छतेवर लाखो रुपयांचा चुराडा करणाऱ्या मालवण नगरपालिकेच्या स्मशानभूमीची दुरावस्था ही मालवण नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची साक्ष देणारी आहे मालवण देऊळवाडा येथील स्मशानभूमीत कचऱ्याचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून स्मशानभूमीची देखभाल करणाऱ्या ठेकेदारांकडून याठिकाणी कोणतीही स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुर्दैवाने मृत व्यक्तींना त्यांच्या अखेरच्या प्रवासात कचरा व दुर्गंधीच्या साथीने निरोप देण्याची वेळ स्थानिक नागरिकांवर आली आहे त्यामुळे प्रशासनाने स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी मालवणचे नगरसेवक आणि माजी आरोग्य सभापती श्री आपा लुडबे यांनी केली आहे.
मालवण शहरातील प्रभाग सात मध्ये असलेल्या देऊळवाडा येथील स्मशानभूमीच्या कचरा व घाणीमुळे झालेल्या दुरावस्थे बाबत नगरसेवक आप्पा लुडबे यांनी नगरपालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे. मालवण शहरातील देऊळवाडा येथील स्मशानभूमीत असलेला कचरा व घाणीचे साम्राज्य हे शहरातील स्मशानभूमीचे प्रतिनिधीक रूप आहे शहरातील बहुतांश स्मशानभूमीची अवस्था ही अशीच आहे रॉक गार्डन व स्मशानभूमींच्या स्वच्छता व देखभालीसाठी ठेकेदार नेमण्यात आले आहे. मात्र या ठेकेदारांकडून देऊळवाडा स्मशानभूमीच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे या स्मशानभूमीत कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे स्मशानभूमीची बकाल अवस्था झाली आहे. अशा स्थितीतच स्थानिक नागरिकांना मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. यामुळे नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. ठेकेदारांकडून दिलेल्या ठेक्याची कामे चोखपणे करून घेणे आवश्यक असताना प्रशासनाचा कोणताही वचक ठेकेदारांवर नाही.
प्रशासनाने स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी केली आहे.

