*⚡कणकवली ता.२८-:* मुंबई गोवा महामार्गावर तळेरे ते खारेपाटण अशी गस्त घालत असताना नडगिवे बसस्टॉपच्या दरम्यान एका टेंपोची वनकर्मचार्यांनी तपासणी केली असताना त्यामध्ये खैराचे शेडीव लाकूड आढळून आले. या गाडीचालक व क्लिनरकडे कोणताही पास नव्हता. त्यामुळे सदर टेंपो वनविक्री आगार फोंडाघाट येथे घेऊन चला असे वनअधिकारी, कर्मचार्यांनी सांगितले असता लाकूड मालक राजाराम आत्माराम गावडे (रा. तळवडे, सावंतवाडी) व त्यांच्या दोन्ही मुलांनी वनअधिकारी, कर्मचार्यांच्या अंगावर धावून वादविवाद करत दमदाटी केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून टेंपो घेऊन पलायन केले. याप्रकरणी टेंपो चालक, क्लिनरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोंडा परिमंडळाचे वनअधिकारी अनिल जाधव व त्यांचे कासार्डे येथील वनरक्षक महालिंगाप्पा शेगावे हे मोटरसायकलवरून तळेरे ते खारेपाटण असे गस्त घालत होते. रात्री 8.30 वा. च्या सुमारास नडगिवे बसस्टॉपच्या पुढे 100 मी. अंतरावर मुंबईकडून गोव्याच्या दिशेने एक संशयित टेंपो जाताना दिसला. त्याचा संशय आल्याने त्या टेंपोचा पाठलाग करून थांबवले आणि गाडीत काय भरले आहे? अशी विचारणा केली. गाडीच्या मागील बाजूस जाऊन ताडपत्री वर करून आतमध्ये पाहिले असता टेंपोमध्ये खैर शेडीव किटा लाकूड दिसून आले. त्यांच्याकडे पासची विचारणा केली असता पास नव्हता. सदरचा माल हा राजाराम गावडे (तळवडे) यांचा असल्याचे सांगण्यात आले, मात्र लाकूड कुठून भरून आणले आहे हे सांगण्यास त्याने नकार दिला. चालक, क्लिनर आपली नावेही सांगत नव्हते. या दरम्यान खारेपाटण वन उपज तपासणी नाक्यावरील स्टाफ वनरक्षक विश्वनाथ माळी व चंद्रिका लोहार यांना मदतीकरिता घटनास्थळी बोलवण्यात आले. तसेच वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांना फोनवरून माहिती देण्यात आली. तसेच टेंपोतील मालाचा फोटो काढायचा असल्याने ताडपत्री बाजूला करण्यास सांगितले असता फोटो काढण्यास मज्जाव करण्यात आला. जोपर्यंत आपले वडील इकडे येत नाहीत तोपर्यंत आपण ताडपत्री उघडणार नाही असे सांगितले. दरम्यान रात्री 12.30 वा. च्या सुमारास वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर, स्टाफ वनमजुर शिर्के, निलेश साठे हे घटनास्थळी आले. त्याचदरम्यान गाडीचे मालक त्यांच्या दोन मुलांसमवेत त्या ठिकाणी आले. राजाराम गावडे व त्यांचे मुलगे विकास गावडे, इंद्रजित गावडे (सर्व रा. तळवडे) असे त्यांनी नाव सांगितले. वनअधिकारी, कर्मचार्यांनी त्यांना सदर वाहनावर व मालावर गुन्हा नोंद आहे, त्यामुळे पुढील कारवाईसाठी टेंपो वनविक्री आगार फोंडाघाट येथे घेऊन चला असे सांगितले. मात्र गाडीमालक राजाराम गावडे व त्याच्या मुलांनी तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही गाडी फोंडा येथे घेऊन जाणार नाही, माझी एकट्याचीच गाडी दिसली का?, अशा कितीतरी गाड्यात जातात, तुम्ही कारवाई का करत नाही? असे सांगून राजाराम गावडे व त्यांच्या दोन्ही मुलांनी वनअधिकार्यांच्या अंगावर धावून येऊन वादविवाद करत दमदाटी केली व काही न सांगता सरकारी कामात अडथळा करून टेंपोचा चालक क्लिनरसह खैर शेडीव किटा लाकूड असलेला टेंपो (एमएच07 ए.जे.2555) हा घेऊन तेथून पळून गेले. याप्रकरणी वनअधिकारी अनिल जाधव यांच्या तक्रारीवरून टेंपोचा चालक,क्लिनरसह राजाराम गावडे, विकास गावडे, इंद्रजित गावडे (सर्व रा. तळवडे) यांच्याविरूध्द वनअधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.
खैराची अवैध लाकुड वाहतूक व शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल
