*⚡मालवण ता.२५-:* पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करुन मालवण रेवंडी येथील तरुणाची फसवणूक करत त्याची मोबाईल व दुचाकी घेऊन पसार झालेल्या शुभम सुनील पवार (वय २८, रा. साखरी गुहागर) याला मालवण पोलिसांनी बुधवारी गुहागर येथुन ताब्यात घेत अटक केली. शुभम याला आज मालवण न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शुभम याच्या विरुद्ध मालवण रेवंडी येथील मयूर कांबळी याने मालवण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मयूर कांबळी याची महिन्याभरापूर्वी प्रवासा दरम्यान रेल्वेमध्ये शुभम पवार याच्याशी ओळख झाली होती. यावेळी शुभम पवार याने आपण सावतंवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक असून अनेकांना नोकरी देतो असे सांगितले होते. या ओळखीतुन शुभम हा २० नोव्हेंबर रोजी शनिवारी मयूर याच्या रेवंडी येथील निवासस्थानी पोहोचला. त्याने मयूर याला त्याच्याच दुचाकीवरून आचरा येथे घेऊन गेला. तेथील पेट्रोल पंपवर पेट्रोल भरले. यावेळी त्याने मयुर याला तिथेच उतरवून आपण त्रिबंक येथे जाऊन येतो असे सांगून पसार झाला. यावेळी मयूर याचा मोबाईलही त्याच्याकडेच होता. आपली फसवणूक झाल्याचे मयूर याच्या निदर्शनास येताच त्याने मालवण पोलीस स्थानकात याची तक्रार दिली. दुचाकी व मोबाईल घेऊन पसार झालेल्या शुभम पवार याचे मोबाईल लोकेशन गुहागर येथे आढळुन आले. त्यानुसार सापळा रचुन मालवण पोलिसांनी त्याला बुधवारी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक भारत फारणे योगेश सराफदार सुहास पांचाळ प्रतीक जाधव यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक असल्याचे सांगुन शुभम पवार याने अन्य किती जणांनी फसवणूक केली का? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.
पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करून गंडा घालणाऱ्या तरुणास न्यायालयीन कोठडी
