मालवण दि प्रतिनिधी जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला झाडीझुडूपानी वेढल्याची माहिती मिळाल्यानंतर मालवण शहरातील विविध बचतगटातील सुमारे ११० महिलांनी आज किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम राबवून झाडीझुडूपे तोडून आणि प्लॅस्टीक कचरा गोळा करून समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला. दरम्यान , या मोहिमेत सहभागी होणाऱ्या महिलांना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व नगरसेवक दिपक पाटकर यांनी हॅण्डग्लोज आणि सॅनिटायझरच्या बाटल्या दिल्या. मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात झाडीझुडूपे वाढल्याची माहिती मिळाल्याने एक दिवस स्वच्छता मोहिम राबविण्याचा निर्णय शहरातील महिला बचतगटांच्यावतीने घेण्यात आला. यासाठी नियोजन करून महिला बुधवारी सकाळी किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी पोहचल्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष श्री सुदेश आचरेकर यांनी मालवणातील महिलांनी आज महत्वपूर्ण निर्णय घेत स्वच्छता मोहिम राबविली आहे. अशाप्रकारे किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यातसाठी इतरही सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. महिलांनी आज आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासाठी आमच्याकडून नेहमीच त्यांना सहकार्य राहणार असल्याचे सांगत श्री आचरेकर यांनी महिलांच्या स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले. यावेळी नगरसेवक दिपक पाटकर, बंटी चव्हाण आदी उपस्थित होते.
बचतगटातील सुमारे ११० महिलांकडून सिंधुदुर्ग किल्ल्यावर राबवण्यात आली स्वच्छता मोहीम…
