मालवण दि प्रतिनिधी कोकणला संस्कृती व लोककलांचा मोठा वारसा लाभला आहे. येथील लोककला पुढच्या पिढीला कळल्या पाहिजेत. या दृष्टीने मालवण पंचायत समितीने आयोजित केलेल्या लोककला महोत्सव हा स्तुत्य उपक्रम आहे. सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी मालवण पंचायत समिती जे काम करतेय ते काम पालकमंत्री, आमदार खासदार करत नाहीत. नुसते राणे काय करतात हे बघण्याच्या पलीकडे मालवण पंचायत समितीच्या कामाला जो दर्जा प्राप्त झाला आहे, त्या दर्जाचा पाठलाग करण्याचे काम पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी करावे, असा जोरदार टोला भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी येथे बोलताना केले. मालवण पंचायत समिती तर्फे आयोजित लोककला महोत्सवाचा सांगता सोहळा भाजप नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निलेश राणे यांच्या हस्ते नटराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, उद्योजक दीपक परब, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोक सावंत, जि. प. सदस्य संतोष साटविलकर, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, बाबा परब, पं. स. सदस्य मनीषा वराडकर, बाबा परब, आबा हडकर, भजनीसम्राट भालचंद्र केळुसकर, राजू बिडये, विक्रांत नाईक आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती तर्फे निलेश राणे व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर भजनसम्राट भालचंद्र केळुस्कर यांना निलेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी निलेश राणे म्हणाले, मालवण पंचायत समिती सातत्याने उत्तम उपक्रम राबवत असून त्याबद्दल मला समाधान वाटते. इथल्या लोककला या पुढच्या पिढीला कळल्या पाहिजेत, महाराष्ट्राला कळल्या पाहिजेत, लोककलाकारांना व्यासपीठ मिळाले पाहिजे, यादृष्टीने पंचायत समितीने आयोजित केलेला लोककला महोत्सव कौतुकास्पद आहे. पंचायत समितींना मिळणारा सेस फंड गेले दीड वर्ष मिळालेला नाही, त्यामुळे पंचायत समिती चालवायची कशी हा प्रश्न आहे. सरकारची मदत नसतानाही जनतेला काय हवंय आणि काय दिल पाहिजे हे ओळखून मालवण पंचायत समिती सातत्याने कार्यक्रम घेत आहे, सर्वांची उणीव भरून काढत चोख कामगिरी मालवण पंचायत समिती करत आहे, अशा उपक्रमांसाठी माझे नेहमीच सहकार्य लाभेल, असेही निलेश राणे म्हणाले. आज जिल्ह्यात पाऊस पडतोय, या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र याबाबत कोणाला काही वाटत नाही, जिल्ह्याच्या परिस्थितीवर कोणी बोलत नाही. म्हणूनच ओला दुष्काळ जाहीर करावा की नाही याबाबतची भूमिका भाजप घेणार आहे. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते जनतेत राहून काम करत आहेत. आज मुख्यमंत्री शस्त्रक्रियेमुळे गायब आहेत, मुख्यमंत्री आधी दिसत तरी होते, आता दोन महिने दिसणार नाहीत, अशी टीकाही निलेश राणे यांनी केली. यावेळी अजिंक्य पाताडे यांनी वृद्ध कलाकारांना शासकीय मानधन मिळविताना अडचणी येत असल्याने या लोककला महोत्सवाद्वारे कलाकारांच्या कला सादरीकरणाची चित्रफीत व फोटो उपलब्ध होऊन पंचायत समितीचे प्रमाणपत्रही दिले जात आहे, त्यामुळे मानधन मिळण्यातील पुराव्याच्या अडचणी कमी होतील असे सांगितले. तर उपसभापती राजू परुळेकर यांनी तालुक्यातील विशेष घटकांना प्राधान्य देण्यासाठीच अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, लोककला महोत्सवातून तालुक्यात दडलेल्या विविध कला पाहता आल्या असे सांगितले. तर सुदेश आचरेकर यांनी आजच्या लोककला सादरीकरणात अनेक नाविन्यता आली आहे, अशा उपक्रमांना निलेश राणे नेहमीच पाठिंबा देत असून जिल्हाभर लोकांच्या प्रश्नासाठी ते फिरत आहेत असे सांगून मालवणात आमदार वैभव नाईक कितीवेळा येतात ? असा सवाल उपस्थित केला. यावेळी अशोक सावंत, संतोष साटविलकर,राजेंद्र पराडकर यांनीही विचार मांडत शुभेच्छा दिल्या. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी विविध लोककलांचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रसेन पाताडे यांनी केले. तर आभार कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी मानले.
खासदार, पालकमंत्री, आमदारांनी मालवण पंचायत समिती सारखं करावं काम; निलेश राणेंचा टोला
