सावंतवाडी : येथील सुनील तळेकर ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा विशेष पुरस्कार समानवता ट्रस्ट सिंधुदुर्गला जाहीर झाला आहे.सुनील तळेकर ट्रस्टच्यावतीने अनेक सामाजिक कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविले जातात. स्व. सुनील तळेकर यांच्या २६ नोव्हेंबर या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदाचा विशेष पुरस्कार ‘समानवता ट्रस्ट’ सिंधुदुर्गला जाहीर झाला आहे. समानवता ट्रस्ट समाजातील निराधारांना आधार देण्याचे काम करीत आहे. त्याचबरोबर उद्योजकता विकास कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, दिव्यांग बांधवांसाठी सहकार्य, पूरग्रस्तांना मदत असे अनेक सामाजिक बांधिलकी जोपसणारे उपक्रम राबवून आपल्या पद्धतीने समानवता ट्रस्टचे कार्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन या संस्थेद्वारे केले जाते. हा सन्मान म्हणजे नि:स्वार्थी भावनेने केलेल्या सामाजिक कार्याची पोचपावती असल्याची भावना ‘समानवता’चे सचिव कमलेश गोसावी यांनी व्यक्त केली आहे.
समानवता’ ट्रस्टला सुनील तळेकर ट्रस्टचा विशेष पुरस्कार जाहीर
