आठ महिने झाले तरी पावसाळा
*⚡बांदा ता.२४-:* बांदा दशक्रोशीत मंगळवारी संध्याकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कापलेल्या भात पिकाचे नुकसान झाले तर उभे असलेले नाचणी पिक आडवे होऊन गळू लागले आहेत. भातकापणी पूर्णत्वास येत असतानाही सलग आठ महिने सुरू असलेला पाऊस शेतकऱ्याची मात्र काही केल्या पाठ सोडेना. निदान आता तरी अधिकाऱ्यांनी शेतात उतरून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी. तसेच पिकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दोन दिवस काहीशी विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी संध्याकाळी मडुरा पंचक्रोशीत दमदार हजेरी लावली. लोंब्याचे भात पडलेले असताना उरलेसुरलेले पिक हातात घेण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड केली परंतु आलेल्या अवकाळी पावसात प्रयत्न तोकडे पडले. पाडलोस येथील शेतकरी सुर्यकांत नाईक म्हणाले की, कापलेल्या भाताच्या लोंब्या पावसाने झडून गेल्या, वैरण हाताला येणार नाही. जेवढा खर्च झाला त्यापेक्षा कमी उत्पन्न मिळणार. शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करावा. भाताची कापणी, झोडपणी ही पुढील कामे करायला मजुरांची संख्या वाढेल. भात पिकाचे इतके नुकसान झाले की मजुरी द्यायला देखील परवडणार नाही. सरकारने केवळ भरपाईचा गाजर न दाखवता प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा करावी, अशी मागणी भाजपा सातार्डा शक्तीकेंद्रप्रमुख यशवंत उर्फ तात्या माधव यांनी केली.
