बांधकामनंतर आता आरोग्य विभागातील ठेकेदारांवरही बडगा

दीपक केसरकर यांचा रुद्रावतार;सावंतवाडी उपज़िल्हा रुग्णालयाला अचानक दिली भेट

सावंतवाडी : कामचुकार ठेकेदारांविरोधात ‘मिशन ब्लँक लिस्ट’ सुरू केल्यानंतर माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आता येथील उपज़िल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यानाही लक्ष्य केले आहे. रस्त्याच्या ठेकेदारांवरील कारवाईनंतर केसरकर यांनी आरोग्य विभागाच्या ठेकेदारांवरही कारवाईचा बडगा उगारल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत रूग्ण, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वारंवार आवाज उठवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री आ. दीपक केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम व उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत हॉस्पिटलची पहाणी केली. २ कोटी निधी देऊन देखील काम न झाल्यानं दीपक केसरकर यांचा पारा चढला. अपूर्ण कामाबाबत नाराजी व्यक्त करत घेवारी नामक ठेकेदाराला तात्काळ ब्लँक लिस्ट’मध्ये टाका असा आदेश दिला. उपजिल्हा रूग्णालयाच्या नूतनीकरणासाठी २ कोटी देऊन सुद्धा चांगले काम होत नसेल ठेकेदार दुर्लक्ष करत असेल तर ते चालणार नाही. आता यावर मी स्वतः लक्ष घालत काम करून घेणार आहे. निधी दिलेली कामे येत्या आठ दिवसात पूर्ण न झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा आ. दीपक केसरकर यांनी दिला. यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,अशोक दळवी,योगेश नाईक, माजी नगरसेवक सुदन आरेकर,राजन मुळीक आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page