रेडी येथील त्रिभुज गणेश मंदिरात अंगारकी संकष्ट चतुर्थी साजरी

*⚡वेंगुर्ला ता.२३-:* रेडी येथील त्रिभुज गणेश मंदिरात आज अंगारकी संकष्ट चतुर्थी गणेश भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी गणेश मूर्तीवर दुग्धशर्करायुक्त अभिषेक, मंत्रपुष्पांजली, ब्राह्मणांच्या साक्षीने वेदमंत्रपठण, काकड आरती, तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. अंगारकीनिमित्त मंदिरात सकाळपासूनच गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, बेळगाव, कोल्हापूर, गडहिंग्लज आदी ठिकाणच्या भाविकांनी गणपतीचे दर्शन घेत नवसफेड केली. अंगारकीनिमित्त सकाळपासून रेडी मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू होती. रेडी, शिरोडा, आरोंदा परिसरातील भाविकांनी पायी चालत गणपतीचे दर्शन घेतले. गडहिंग्लज येथील गणेश भक्त मंडळाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत खिचडी वाटप केले. मंदिर परिसरात केळी, नारळ, अगरबत्ती दुर्वा, फुले घेऊन व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली होती. अजूनही गणेश भक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे.

You cannot copy content of this page