शासनाने अंत न पाहता एस.टी.कर्मचाऱ्यांना वेळीच न्याय द्यावा

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालयेकर यांचे प्रतिपादन

*⚡कणकवली ता.१९-:* एस.टी. कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठीच आहे. त्यांना न्याय देण्याअगोदरच संप मोडीत काढणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार म्हणावा लागेल. शासनाचे हे कामगार विरोधी धोरण लक्षात घेऊन प्रत्येक कर्मचारी व प्रवासी जनतेने आता मोठी चळवळ उभी केली पाहीजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद घेऊन उभ्या महाराष्ट्रात सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना शासनाने अंत न पाहता वेळीच न्याय द्यावा व प्रवासी जनतेचीही गैरसोय दूर करावा, असे प्रतिपादन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालयेकर यांनी केले. एसटी कर्मचारी संपाबाबत गुरुवारी सकाळी प्रवासी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री, राज्यपाल व संबंधित प्रशासनाला निवेदने पाठविण्यात आली. त्यानंतर कणकवली बसस्थानक येथे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन संपाला जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला. याप्रसंगी श्री पालयेकर यांच्यासह समन्वयक दादा कुडतरकर, उपाध्यक्ष रमेश जोगळे, राजाराम परब, रमाकांत बाणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. रमेश जोगळे म्हणाले, सर्व संघटनांनी एकत्र येऊन हा लढा उभा केला आहे. एकीचे बळ मोठे असते, हे कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवून फुट न पाडता आपले कुटुंब एकत्र ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याची आहे. गेली अनेक वर्षे एसटीची प्रवासी जनतेशी वेगळी नाळ जोडलेली आहे. मात्र, या संपामुळे शासनाने केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर प्रवासी जनतेलाही वेठीस धरले आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, याचाही शासनाने विचार केला पाहीजे. हा संप मोडीत काढण्याचा प्रकार म्हणजे गिरणी कामगारांसारखीच या कर्मचाऱ्यांची अवस्था शासनाने करू नये. त्यांना योग्य तो न्याय देत संपावर वेळीच तोडगा काढावा. दादा कुडतरकर म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे हनुमंताने लंकेत केलेल्या पहिल्या ‘सर्जिकल स्टूईक’ प्रमाणे आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने हनुमंताच्याच भूमिकेत रहावे. संप म्हणजे एकी आणि एकीची ताकद मोठी असते, हे शासनाने अनेकदा अनुभवले आहे. त्यामुळे याही शासनाला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घ्यावीच लागेल. मात्र, न्यायासाठी लढणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी शांतता व संयमाने आपला लढा सुरु ठेवला, हे कौतुकास्पद आहे . यावेळी सुधीर सोनवणे, मनोजकुमार पवार, अविनाश दळवी, गुरू सामंत, सुधीर सावंत, गणेश शिरकर, गोविंद जाधव आदींसह एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page